Dasara Melava: देशभरात आज दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना, महाराष्ट्रात मात्र या सणाला राजकीय महत्व प्राप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण राज्यात आज महत्वाचे चार दसरा मेळावे होणार आहे. ज्यात भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे (Pankaja munde) यांचा सावरगाव घाट येथे होणारा दसरा मेळाव्याचे समावेश आहे. पंकजा मुंडे यांच्या या मेळाव्याच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला असून, बीडच्या खासदार डॉ.प्रितम मुंडे (pritam munde) यांच्या नेतृत्वात गोपीनाथ गड ते भगवान भक्ती गड रॅलीला सुरवात झाली आहे. यावेळी ठीक-ठिकाणी प्रितम मुंडे यांचे स्वागत केले जात आहे.
आज सकाळी सहा वाजता प्रितम मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात केली. गोपीनाथ गडावरून निघालेली रॅली सिरसाळा, दिंदृड, तेलगाव, वडवणी, घाटसावळी, बीड, वंजारवाडी मार्गे नायगाव, तांबवा राजुरी, चुंबळी फाटा, वांजरा फाटा, कुसळंब भगवान भक्तीगड सावरगाव अशी असणार आहे. तर यावेळी मोठ्या संख्येने लोकांचा सहभाग रॅलीत पाहायला मिळत आहे.
पंकजा मुंडे काय बोलणार?
सावरगाव घाट येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यात दरवर्षीप्रमाणे यावेळी सुद्धा पंकजा मुंडे यांचे भाषण होणार आहे. त्यामुळे यावेळी पंकजा मुंडे या काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी मी बेरोजगार असल्याचं विधान केले होते. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आता आमचे बहिण-भावाचे नातं राहिलं नसल्याचे विधान केले होते. त्यामुळे या सर्व घडामोडी पाहता पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. तसेच पंकजा मुंडे यांना डावलण्यात येत असल्याचे विधान सुद्धा अनेकदा होतच असतात, यावर सुद्धा पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सुद्धा पंकजा मुंडे समर्थकांचे लक्ष लागले आहे.
यावर्षी मोठा प्रतिसाद: प्रीतम मुंडे
गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन रॅलीसाठी निघालेल्या प्रितम मुंडे यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया देतांना म्हंटले आहे की, दरवर्षी आम्ही गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन रॅलीला सुरवात करतो आणि कार्यकर्ते तेथून सोबत यायला सुरवात होते. मात्र यावर्षी थेट घरून निघतानाच कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत असल्याने यावर्षी प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळत असल्याचं प्रितम मुंडे म्हणाल्यात.