Yogeshwari Devi: महाराष्ट्राचे शक्तीपीठ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोकणवासियांची कुलस्वामिनी अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सवास सुरुवात झालीय. अंबाजोगाईच्या अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिस्कर यांच्या हस्ते शासकीय पूजा आणि घटस्थापना करण्यात आली. या महोत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. या महोत्सवाच्या कालावधीत संगीत भजन, गायन कीर्तन, जगदंबेचा गोंधळ अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. त्या पार्श्वभूमीवर मंदिर सुरक्षा व्यवस्थेसाठी प्रशासनाच्या वतीने ठोस उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. कोरोनानंतर सलग दोन वर्षांनी खुल्या वातावरणात महोत्सव साजरा होत असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिस्कर यांच्या हस्ते शासकीय पूजा आणि घटस्थापना करण्यात आली. तर सकाळी सहा ते रात्री 11 वाजेपर्यंत भाविकांना श्री योगेश्वरी देवीचे थेट दर्शन घेता येणार आहे.
मंदिरात आराध बसण्याची परंपरा
राज्यात वेगवेगळ्या मंदिरात वेगवेगळ्या परंपरा आणि प्रथा पाळल्या जातात. त्याचप्रमाणे योगेश्वरी देवीच्या मंदिरात नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत आराध बसण्याची परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु आहे. या परंपरेनुसार 10 ते 15 हजार महिला सलग नऊ दिवस मंदिरातच मुक्काम करत निवासी असतात. या सर्व महिलांची व्यवस्था मंदिर कमिटीच्या वतीने केली जाते. दरम्यान या महोत्सवाच्या कालावधीत दररोज कीर्तन, प्रवचन, भजन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सुद्धा करण्यात येते.
श्री रेणुका देवीच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ
लातूरच्या रेणापूरच्या पंचक्रोशीत भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री रेणुका मातेच्या शारदीय नवरात्रोत्सावस आजपासून सुरुवात झाली. श्री रेणुका देवी विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत व तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड यांच्या हस्ते आज घटस्थापना झाली. पुढील 9 दिवस नवरात्रामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम व दररोज महाप्रसाद तसेच महापूजा आर्दीचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रामध्ये भाविकांना देवीचे दर्शन व्यवस्थित घेता यावे यासाठी विश्वस्त मंडळाकडून तशी व्यवस्था करण्यात आली आहे. तर 5 ऑक्टोबर रोजी दसरा विजयादशमी निमित्ताने रात्री साडे आठ वाजता देवीच्या पालखीचे मंदीरातून प्रस्थान होऊन ही पालखी गावातून मिरवणुकीने परत देवीच्या मंदिरात येते.
महत्वाच्या बातम्या...
Navratri 2022 : शारदीय नवरात्रीला करा आई अंबेची 'ही' आरती, सर्व मनोकामना होतील पूर्ण
Navratri 2022: शारदीय नवरात्रीत तुमच्या राशीनुसार करा 'हे' उपाय, मिळेल देवीचा आशीर्वाद