Beed Unseasonal Rain : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसासह (Unseasonal Rain) गारपीटने धुमाकूळ घातला आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात (Beed District) देखील याचा मोठा फटका बसला आहे. तर शनिवारी पुन्हा एकदा आष्टी (Ashti) तालुक्यातील अनेक भागात गारपीट झाली आहे. यात 18 गावांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. तर एकट्या आष्टी तालुक्यातील एक हजार तीनशे हेक्टर जमिनीवरील पिकांना आणि फळबागांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तर 3 हजार 200 शेतकऱ्यांच नुकसान झालं आहे.
आष्टी तालुक्यातल्या अनेक भागात शनिवारी अवकाळी पावसासह गारपीट झाली होती. ज्यात अरवहिरा गावच्या शिवारात मुसळधार गारांचा पाऊस पडला होता. सायंकाळच्या वेळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आणि त्यातच गारांचा पाऊस देखील झाला. पाऊस एवढा मुसळधार होता की, सर्वत्र गारांचा सडा पाहायला मिळत होता. दरम्यान या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे प्राथमिक आकडेवारी समोर आली आहे.
आष्टी तालुक्यातील 3 हजार 200 शेतकऱ्यांच नुकसान
बीडच्या आष्टी तालुक्यातील दौलावडगाव परिसरातील देऊळगाव घाट, पिंपळगाव घाट यासह तालुक्यातील 18 गावांमध्ये झालेल्या गारपिटीमुळे 1 हजार 300 हेक्टर जमिनीवरील पिकांना आणि फळबागांना मोठा फटका बसला आहे. आष्टी तालुक्यात दोन दिवस झालेल्या वादळी वारा आणि गारपिटीमुळे शेती पिकासह फळबागाचा देखील प्रचंड नुकसान झाला आहे. या गारपिटीमुळे तालुक्यातील 3 हजार 200 शेतकऱ्यांच नुकसान झालं आसून, शासनाने तात्काळ पंचनामे करून सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दुसरीकडे तलाठी आणि मंडळाधिकारी याचबरोबर कृषी सहायक यांनी या नुकसानीची पाहणी करून दोन दिवसांमध्ये किती नुकसान झाले याची माहिती प्रशासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
अनेक कुटुंब उघड्यावर
आष्टी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे फक्त एका गावातच नुकसान झालं नसून, तालुक्यातील दहा ते बारा गावांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. यामध्ये फक्त फळबागाच नाही तर नागरिकांच्या राहत्या घरांचे देखील मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. शनिवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले आहेत. त्यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर आली आहे. त्यामुळे सरकराने याची दखल घेऊन मदत करण्याची मागणी होत आहे. दरम्यान अवकाळी पाऊस अजूनही बरसतो आहे. तर उन्हाचा तडाखा देखील वाढत असून दुसरीकडे अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. तसेच पशुधनाचे देखील नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: