Beed News: देवस्थानच्या बेकायदा जमिनी बळकवल्याप्रकरणी भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश धस यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि भाऊ यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीनंतर धस यांच्यावर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे धस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण...
बीड जिल्ह्यात प्रशासनाला हाताशी धरून देवस्थान जमिनीचे घोटाळे झाले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी केला होता. तर वक्फच्या प्रकरणात गुन्हे दाखल असून, हिंदू देवस्थानच्या प्रकरणात मात्र गुन्हे दाखल झाले नसून, गुन्हे दाखल करण्याची मागणी करत पोलीस आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. मात्र गुन्हे दाखल न झाल्याने त्यांनी औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad Bench) धाव घेतली होती. त्या नंतर औरंगाबाद खंडपीठाने खाडे यांची तक्रारच एफआयआर म्हणून ग्राह्य धरत फौजदारी गुन्हे नोंद करा व नंतर तपास करा, असे आदेश दिले होते. याच आदेशाच्या विरोधात सुरेश धस यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
धस यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका
खाडे यांची तक्रारच एफआयआर म्हणून ग्राह्य धरत फौजदारी गुन्हे नोंद करा व नंतर तपास करा, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिल्याने, धस यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र यावर निकाल देतांना सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत धस यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. त्यामुळे अखेर सुरेश धस यांच्यासह त्यांच्या पत्नी, भाऊ देविदास धस आणि मनोज रत्नपारखी आणि असलम नवाब खान अशा पाच जणांवर आष्टी पोलीस ठाण्यामध्ये अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'या' ठिकाणी घोटाळ्याचा आरोप...
बीडच्या आष्टी तालुक्यातील विठोबा देवस्थान, मुर्शदपूर, विठोबा देवस्थान, पांढरी, विठोबा देवस्थान, खडकत, खंडोबा देवस्थान, बेलगाव, श्रीरामचंद्र देवस्थान, आष्टी, श्रीरामचंद्र देवस्थान, चिखली, श्रीरामचंद्र देवस्थान, चिंचपूर व पिंपळेश्वर देवस्थान, आष्टी या देवस्थानांच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणात आधी फौजदारी गुन्हे नोंद करा व नंतर तपास करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. आता हाच निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देखील कायम ठेवला आहे.
बीडमध्ये गुंडाचा फिल्मी थरार, चालत्या गाडीत पोलिसाचा गळा आवळला, जीप पलटी होऊन 5 पोलिस जखमी