Beed News: माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांच्यासह त्यांच्या पत्नी मंगल प्रकाश सोळंके यांच्यावर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजलगावचे भाजप कार्यकर्ते अशोक शेजुळ यांच्यावर हल्ला करून त्यांना मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजलगाव शहरातील शाहू नगर येथे शेजुळ यांना अडवून रॉडने जबर मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली होती. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक शेजुळ यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, ते दररोज प्रमाणे मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पान खाण्यासाठी गेले. पान घेतल्यानंतर शेजूळ हे आपल्या घरी परत जात असताना शाहू नगर येथील मोरेश्वर विद्यालय जवळ पाठलाग करत असलेल्या सहा लोकांनी अडवले. दरम्यान काही समजण्याच्या आता हल्लेखोरांनी शेजूळ यांच्यावर रॉडने हल्ला करायला सुरुवात केली. दरम्यान शेजूळ यांना मारहाण होत असताना तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी धाव घेतली असता, मारहाण करणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणाहून पोबारा केला.
गंभीर जखमी असल्याने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला रवाना
या मारहाणीत अशोक शेजूळ जखमी झाल्याने त्यांना, शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. या मारहाणीत शेजुळ हे अत्यंत गंभीर जखमी झाले होते. ज्यात त्यांना डाव्या पायाला तीन फ्रॅक्चर, उजव्या पायाला एक फ्रॅक्चर तर दोन्ही हात ही फ्रॅक्चर असून डोक्याला ही जबर मारहाण झाल्याचे समोर आले आहे. तर अशोक शेजूळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आमदार प्रकाश सोळंके, त्यांची पत्नी मंगल प्रकाश सोळंके, रामेश्वर टवाणी यांच्यासह पाच ते सहा जणांवर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंतरिम जामीन मंजूर!
या हल्लाप्रकरणी माजलगाव न्यायालयाने आमदार प्रकाश सोळंके व त्यांच्या पत्नी मंगल सोळंके यांना 13 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. माजलगाव न्यायालयात जामीन अर्ज सादर केला असता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी. जी. धर्माधिकारी यांनी मूळ अर्जाचा निकाल लागेपर्यंत आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह त्यांच्या पत्नी मंगल सोळंके यांना 13 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. आमदार सोळंके यांच्यावतीने अॅड. बी. आर. डक यांनी काम पाहिले.
इतर महत्वाच्या बातम्या:
Beed : राष्ट्रवादीच्या आमदारानं घेतली तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट, बीड जिल्ह्यात खळबळ