Vinayak Mete: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधनाच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुळात बुडाला आहे. तर महाराष्ट्रातील राजकारणात आपलं वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या विनायक मेटेंची एक आक्रमक नेता म्हणून वेगळी ओळख होती. पण मुळात मेटे हे लहानपणापासूनच आक्रमक होते. शाळेत असतानाच त्यांनी आंदोलनाचं अस्त्र उगारत आपल्यावरील अन्यायाविरोधात आवाज उठवल्याची आठवण आजही त्यांचे वर्गमित्र करून देतात.
मुख्याध्यापकाचे गावभर निषेधाचे फलक लावले...
विनायक मेटे हे लहानपणापासूनच आक्रमक होते. चौथीमध्ये असताना बीडच्या राजेगावातल्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी वार्षिक क्रीडा स्पर्धा रद्द केल्या होत्या. त्यामुळे मेटेंनी त्याचा निषेध म्हणून मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या निषेधाचे फलक गावभर लावले होते. पुढे गावात सहावीनंतर वर्ग नसल्याने सातवीच्या शाळेसाठी मेटे कळंबला आले. पण जिथे खायला पैसे नाहीत, तिथे शाळा कुठली आली. त्यामुळे त्यांचे एक वर्ष शाळेविना वाया गेलं. पण पुढे शेतात काम करुन पैसे कमवून मेटेंनी नववीला परस्पर प्रवेश घेतला. रोज पाच किलोमीटरची पायपीट करून शिक्षण घेतले.
मेटेंच्या आंदोलनाने शिक्षण विभाग खडबडून जागं झालं...
सातवीसाठी गावात शाळा नसल्याने मेटे पुढच्या शिक्षणासाठी कळंबला आले. पण कळंबच्या शाळेतही मेटेंना त्यांच्यातला क्रांतिकारी गप्प बसू देत नव्हता. शाळेत एकाही महापुरुषांची जयंती साजरी होत नव्हती. त्यामुळे ननवीत असलेल्या मेटेंनी विद्यार्थ्यांची एकजूट करुन शाळेवरच बहिष्कार टाकला. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाने खळबळ माजली होती. अखेर शिक्षणाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली आणि शाळेत महापुरुषांच्या जयंत्या सुरु झाल्या.
मेटेंना मुंबई खुणावू लागली...
मेटे यांच्यासाठी दहावीचा वर्षे महत्वाचा होता. शेतात कष्ट करून आणि रोज पाच किलोमीटरचा प्रवास करून त्यांनी तीन वर्षे काढले होते. त्यामुळे त्यांनी अफाट कष्ट करत अखेर दहावी 52 टक्क्यांनी पास केली. विशेष म्हणजे त्यावर्षी दहावीला गावातून मेटेंसह फक्त दोघेच पास झाले होते. पुढे त्यांनी केएसके महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयात असताना ते विद्यार्थी चळवळीत सामील झाले आणि तेथूनच मेटेंना मुंबई खुणावू लागली होती. त्यानंतर ते मुंबईत आले आणि पुढे समाजासाठी केलेल्या कामातून त्यांची मराठा आंदोलनाचा नेता म्हणून महाराष्ट्राला ओळख झाली.
महत्वाच्या बातम्या...