Beed News : बीड जिल्ह्याच्या (Beed District) धार तालुक्यातील कासारी गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, पतीने दुसरं लग्न करत असल्याचे सांगितल्याने पत्नीने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या (Suicide) केली. तू मला आवडत नाही, तू घरातून निघून जा, आता मी दुसरे लग्न करणार असल्याची धमकी पतीने दिल्यानेच पत्नीने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना 18 मे रोजी धार तालुक्यातील कासारी गावात घडली. तर याप्रकरणी विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पती, जावई व नंदावा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर ऋतुजा कृष्णा फड (वय 26 वर्षे, रा. हिंगणगाव, ता. अहमदपुरी) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
दरम्यान आत्महत्या करणाऱ्या विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार, 24 डिसेंबर 2021 रोजी विवाहितेचा विवाह हिंगणगाव (ता. अहमदपूर) झाला होता. सुरुवातीचे काही दिवस तिला सुखाने नांदविले, परंतु, नंतर छळ सुरू केला. 7 मे रोजी कृष्णाने ऋतुजाला माहेरी कासारी येथे आणून सोडले. यावेळी विवाहितेने झालेल्या अन्यायाचा पाढा वडिलांसमोर वाचला. तुला मुले होत नाहीत, तू दिसायला छान नाहीस, तू आता घरातून निघून जा, आम्हाला दुसरे लग्न करायचे आहे, असे म्हणत तिला शिवीगाळ करून मारहाण करण्यात येत असल्याचं तिने आपल्या वडिलांना सांगितले. यामुळे ऋतुजा मानसिक तणावात होती. दरम्यान 18 मे रोजी तिचे आई-वडील शेतात काम करण्यासाठी गेले. परत आल्यावर त्यांना ऋतुजा घरातील व्हरांड्यात बेशुद्ध पडलेली दिसली. त्यांनी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यामुळे याप्रकरणी विवाहितेचे वडील बाबुराव बडे यांच्या फिर्यादीवरून पती कृष्णा फड, सासू चिंगुबाई फड व नंदावा राहुल मुंडे यांच्याविरोधात धारूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कर्जाच्या वसुलीसाठी तगादा, महिलेने केली आत्महत्या...
दुसऱ्या एका घटनेत अंबाजोगाई क्रांतीनगर भागात राहणाऱ्या 39 वर्षीय महिलेने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली असल्याने खळबळ उडाली आहे. फैमिदा अलीम शेख (वय 39, रा. क्रांतिनगर, अंबाजोगाई) असे मयत महिलेचे नाव आहे. तर फैमिदा यांनी घरगुती कामांसाठी विविध बचत गट आणि फायनान्स कंपनीकडून कर्ज काढले होते. या कर्ज रकमेच्या वसुलीसाठी बचत गटाच्या रेश्मा शेख, सलमा युसुफ पठाण, शमीम खतीब (तिन्ही रा. क्रांतिनगर, अंबाजोगाई), नसरीन जिलानी शेख, जकीय महबूब महबूब (दोन्ही (दोन्ही रा. आकाशनगर), हीना शेख (रा. लालनगर) आणि सूर्योदय फायनान्सचे कर्मचारी यांनी फैमिदा यांच्याकडे सतत तगादा लावत होते.
तर पैसे वसुलीसाठी धमक्या देण्यात आल्या आणि घरातील सिलेंडरही उचलून नेले. त्यामुळे सततच्या तगाद्याला त्रासलेल्या फैमिदा यांनी शनिवारी सकाळी 10 वाजता राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या मुलीच्या तक्रारीवरून फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यासह सात जणांवर अंबाजोगाई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
धक्कादायक! सामूहिक बलात्काराने बीड हादरलं, आळीपाळीने तब्बल 6 तास अत्याचार