Beed Crime News: बीड (Beed) शहराजवळील एका गावात धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका अल्पवयीन मुलीवर परप्रांतीय तरुणाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना 29 जानेवारीला घडली असून, याबाबत बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद होताच पिंक मोबाईल पथकाने आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. अनुपकुमार नंदूप्रसाद (23, रा. नरकापूर, तैमूर, बिहार) असे आरोपीचे नाव आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, बीड शहराजवळील एका गावात अनुपकुमार हा खांब तयार करण्याच्या कारखान्यात मजूर म्हणून कामाला आहेत. या कारखान्याजवळच वस्ती असून, तेथे काही कुटुंबे राहतात. कारखाना व वस्ती जवळच असल्याने मजूर व कुटुंबांचे एकमेकांकडे येणे-जाणे नेहमी सुरु असते. दरम्यान पीडितेच्या सावत्र आईकडे हा मजूर मद्यपान करण्यासाठी येत होता. 


दरम्यान 29 जानेवारीला सायंकाळी सात वाजता वस्तीवरील 14 वर्षीय मुलगी लघुशंकेसाठी गेली असता, अनुपकुमार याने तिला पकडले व अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलीने आरडाओरड करत कसेबसे घर गाठले. तिने संपूर्ण घटना आपल्या आईला सांगितली. आईने पीडितेसह बीड ग्रामीण पोलीस ठाणे गाठून पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्याकडे तक्रार केली. आईच्या फिर्यादीवरून विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. तर हा गुन्हा पिंक मोबाईल पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे. 


पिंक मोबाईल पथकाची घटनास्थळी धाव...


बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल होताच हा गुन्हा पिंक मोबाईल पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे. तर पिंक मोबाईल पथकाच्या उपनिरीक्षक मीना तुपे, अंमलदार पांडुरंग शिंदे, भरत शेळके यांनी माहिती मिळताच रात्रीतून घटनास्थळ गाठले. त्यानंतर आरोपी अनुपकुमारच्या मुसक्या आवळण्यात आले आहे. तसेच त्याला 30 जानेवारीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.


Beed : बीडमध्ये तब्बल एक कोटींचा गजेंद्र रेडा, तीन किलो सफरचंद करतो फस्त


अनैतिक संबंधातून दोघांची आत्महत्या


दरम्यान दुसऱ्या एका घटनेत अनैतिक संबंधातून दोघांची आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथे उघडकीस आली आहे. एका महिलेसह पुरुषाने एकाचवेळी आत्महत्या (Suicide) केल्याची घटना 26 जानेवारीला समोर आले होते. मोहन बाबूराव नरवडे (वय 53 वर्षे), कौसाबाई भीमराव जाधव (वय 40 वर्षे, दोघे रा. पिंपळनेर) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती, तर घटनेची गंभीरता लक्षात घेत पोलिसांकडून देखील तपास केला जात होता. दरम्यान याचवेळी पोलिसांकडून तपास सुरु असतानाच, त्या दोघांचे अनैतिक संबंध असल्याचे समोर आले आहे. तर आर्थिक व्यवहारातून त्यांच्यात बिनसले होते, यामुळे दोघांनीही आपली जीवनयात्रा संपविल्याची तक्रार महिलेच्या भावाने पोलिसांकडे केली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला आहे.