Beed Crime News: अज्ञात फोन कॉल उचलू नका किंवा आपल्याला आलेला ओटीपी कुणालाही शेअर करू नका असे आवाहन पोलिसांकडून नेहमीच केले जाते. मात्र सायबर भामटे आता याच्याही पुढे गेल्याचे पाहायला मिळत आहे. कारण बीड जिल्ह्यातील गेवराई एका तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना ना कुणाचा कॉल आला, ना त्यांनी कुणाला ओटीपी शेअर केला, तरीही त्यांच्या खात्यातून भामट्याने दहा टप्प्यांत 50 हजार रुपये काढून घेतले. या घटनेनंतर आता पोलीसही चक्रावून गेले आहेत. 


याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ. संजय रामराव कदम (रा. नवजीवन कॉलनी, बसस्थानकामागे, बीड) हे गेवराई येथे तालुका आरोग्य अधिकारी आहेत. दरम्यान दुपारी बारा वाजता ते शहरातील जिल्हा प्रशिक्षण संस्थेत होते, यावेळी त्यांना मोबाईलवर एका संदेश आल्याने त्यांनी तो उघडून पाहिला. ज्यात एसबीआयच्या खात्यातून 5 हजार रुपये कपात झाल्याचा संदेश होता. त्यांनतर अवघ्या काही मिनिटांत टप्प्याटप्प्याने 10 वेळेस त्यांच्या खात्यातून प्रत्येकी पाच हजार रुपये असे एकूण 50 हजार रुपये डेबिट झाले. यानंतर त्यांनी शिवाजीनगर ठाणे गाठून फिर्याद देत, गुन्हा दाखल केला.


बँकेने केले हातवर...


आपल्या खात्यातून अचानकपणे 50  हजार रुपये गायब झाल्याने डॉ. संजय कदम चक्रावून गेले. त्यामुळे त्यांनी तत्काळ एसबीआयच्या मुख्य शाखेत धाव घेत विचारपूस केली. मात्र, त्यांना बँकेकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. तसेच स्वतः बँकेकडून कोणतेही कपात झाली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हतबल झालेल्या कदम यांनी अखेर पोलिसात धाव घेऊन गुन्हा दाखल केला. 


शिक्षकालाही लावला चुना...


बीड जिल्ह्यात दुसऱ्या आणखी एका घटनेत जि.प. शाळेत शिक्षक असलेल्या लहू लक्ष्मण चव्हाण (रा. छत्रपती संभाजीनगर, पांगरी रोड, बीड) यांना क्रेडिट कार्ड बंद करण्याचा बहाणा करून सायबर भामट्याने 19 हजार 561 रुपयांना चुना लावला आहे. आधी व्हिडीओ कॉल करून फोन पे सुरू करायला लावून माहिती जाणून घेतली आणि त्यांनतर बँकेतील पैसे उडवले.  फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर चव्हाण यांनी शिवाजीनगर ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संतोष कुमार नावाच्या भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.