बीड : जालना (Jalna) येथील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी सुरु असलेल्या उपोषणादरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटताना पाहायला मिळाले होते. दरम्यान, यासाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पोलीस विभागाला दोषी ठरवत कारवाईची मागणी केली होती. मात्र, हा लाठीचार्ज सरकारनेच घडवून आणला होता, असा गंभीर आरोप आता जरांगे यांनी केला आहे. बीड दौऱ्यावर असतांना त्यांनी हा दावा केला आहे. 


महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले मनोज जरांगे आज बीड जिल्ह्यात दाखल झाले. यावेळी बीडच्या मोरवडमध्ये त्यांनी समाज बांधवांसाठी संवाद साधतांना सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, 29 तारखेपासून अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणासाठी बेमुदत आंदोलन सुरू केलं होतं. याच आंदोलनाला मोडीत काढण्यासाठी सरकारकडून अनेक प्रकारचे डावपेच खेळण्यात आले. मात्र, आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला आपण सोडणार नाहीत, असे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आंदोलन चिघळण्यासाठी लाठीचार्ज केला. यामध्ये महिला आणि लहान मुलं मोठ्या प्रमाणात जखमी झाले. एवढं होऊन देखील सरकारने अद्यापही लाठीचार्ज का केला? याचे उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे,आंदोलनामध्ये आता आपलं रक्त सांडल आहे. आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा जरांगे यांनी यावेळी सरकारला दिला आहे. 


मनोज जरांगे यांचे बीड जिल्ह्यामध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. मोरवडमध्ये जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळण करत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. जरांगे पाटील सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, त्यांनी आज बीड जिल्ह्यात प्रवेश केला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, "मराठा बांधवांनो आत्महत्या करू नका, आपण सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेणार आहोत. आत्महत्या केल्यानंतर कुटुंब उघड्यावर येतं हे सांगताना मनोज जरांगे भाऊक झाले होते. तर, आता आपली लढाई अंतिम टप्प्यात आली असून, आपण सरकारकडून आरक्षण घेऊ असं जरांगे पाटील म्हणाले. 


सरकारने निकष सांगावे...


मराठा समाज आरक्षणात बसत असतानाही आणि कायद्याचे सर्व निकष पूर्ण करून देखील मराठा समाजाला टिकणारे आरक्षण सरकारने का दिले नाही. गायकवाड आयोगाने मराठा समाज हा मागास असल्याचे सिद्ध केलं होतं. तर, याच मराठा समाजाला विदर्भामध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळते. मग, मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र का मिळत नाही. इतर समाजाला व्यवसायावर आधारित आरक्षण दिल जातं, मग मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्याचे काम सरकार का करत आहे. तर, ओबीसीमधून जर मराठा समाजाला आरक्षण मिळत नसेल तर त्याचे निकष काय आहेत हे देखील सरकारने सांगायला पाहिजे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Manoj Jarange : ऐतिहासिक विजय जवळ आलाय, सरकारला सुटका नाहीच; नांदेडच्या सभेतून जरांगेंचा इशारा