बीड : पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर (Vaidyanath Sahakari Sakhar Karkhana) जीएसटी विभागाने केलेल्या कारवाईनंतर 19 कोटींची थकबाकी प्रकरणी लिलाव केला जाणार आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तर, आपण आर्थिक अडचणीत सापडल्याचे पंकजा मुंडे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, असे असतांना आता पंकजा मुंडे यांच्या मदतीला मुंडे समर्थक धावून आले आहेत. पंकजा मुंडे यांचे समर्थक आणि उसतोड कामगारांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी लोकवर्गणी जमा करण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत 5 कोटी रुपये जमा झाले आहेत. तसेच, पुढील काही दिवसांत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. 


भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटीचे 19 कोटी रुपये थकवल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर मुंडे समर्थकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्रित येत पैसे जमवायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत किमान पाच कोटी रुपयांपेक्षा अधिकचे चेक गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांच्या कार्यालयात जमा करण्यात आले आहेत. या संदर्भात अद्याप पंकजा मुंडे यांची कोणतीही भूमिका समोर आलेली नाही. 


पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्यावर कारवाई झाल्यानंतर भाजपचे पदाधिकारी,अथवा नेते फारसे त्यांच्या मदतीसाठी पुढे आल्याचे पाहायला मिळाले नाही. मात्र, आता मुंडे समर्थक या साखर कारखान्यावर झालेल्या कारवाईनंतर एकत्रित आले आहे. पंकजा मुंडे यांना आर्थिक मदत करण्यासाठी लोकवर्गणीतून पैसे जमा केले जात आहे. यासाठी, सोशल मीडियावर मोहीम देखील राबवली जात आहे. त्यामुळे, बीड जिल्ह्यासह राज्यभरातील मुंडे समर्थक यात सहभाग नोंदवत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांच्या कार्यालयात चेक पाठवत आहे. आतापर्यंत 5  कोटींचे चेक जमा झाले असून, 19 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्याचा निश्चय पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी केला आहे. 


सोशल मीडियावर मोहीम...


पंकजा मुंडे यांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे येत आहे. दरम्यान, यासाठी सोशल मीडियावर विशेष मोहीम देखील राबवली जात आहे. फेसबुक आणि व्हाट्सअप ग्रुपवर मदतीचे मॅसेज फिरवले जात आहे. ज्यातून पंकजा मुंडे यांना मदत करण्याचे आवाहन केले जात आहे. विशेष म्हणजे या मोहिमेला मोठा प्रतिसाद देखील मिळत असून, मुंडे समर्थक यात सहभाग नोंदवत मदत सुद्धा करत आहे. हजारांपासून तर लाखांपर्यंत मदत केली जात आहे. आतापर्यंत 11 लाखांपर्यंत ही मदत करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण 5 कोटी रुपये जमा झाले असून, मदतीचा ओघ सुरूच आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Pankaja Munde : संघर्षातून मार्ग काढेन, वैद्यनाथ कारखान्याच्या 19 कोटींच्या जप्तीनंतर पंकजा मुंडे आक्रमक