नांदेड: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात उपोषण करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) राज्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, रविवारी त्यांनी नांदेड (Nanded) जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी बोलतांना त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. ऐतिहासिक विजय जवळ आलाय, त्यामुळे आरक्षण मिळणारच आणि त्यातून सरकारला सुटका नाहीच असे जरांगे म्हणाले. नांदेडच्या अर्धापूर शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने गेल्या 14 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू असून, या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. 


दरम्यान यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, "मराठा समाजाने मराठा आंदोलनाला गालबोट लागेल असे कुठलेही वर्तन करू नये. शांततेच्या मार्गानेच आरक्षणाची लढाई लढावी. मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. त्यामुळे, सरकारला यापासून सुटका नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.


जल्लोषात स्वागत


जरांगे नांदेडच्या दौऱ्यावर असतांना अनेक ठिकाणी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा मराठा समाज बांधवाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जेसीबीच्या माध्यमातून पुष्प वर्षाव करत, ढोल ताशांच्या गजरात मनोज जरांगे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. 


शासनाने आरक्षण दिल्याशिवाय लढा थांबणार नाही...


यावेळी पुढे बोलतांनी जरांगे म्हणाले की, "मराठा समाजाने अशीच एकजूट यापुढेही कायम ठेवावी. मी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. आपल्यात एकजूट होणे गरजेचे आहे. ही एकजूट 14 ऑक्टोबर रोजी आयोजित अंतरवाली सराटी येथील सभेत सरकारला दाखवायची आहे. मराठा समाजाचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठीच हा दौरा असल्याचे त्यांनी सांगितले. कायदेशीर लढाईच्या नावाखाली आंदोलनाची दिशा बदलण्याचा प्रयत्न होता कामा नये. महाराष्ट्र दौऱ्याच्या संवाद यात्रेत कितीही गर्दी जमा झाली, तरी अजिबात यात्रेला गालबोट लागता कामा नये. अशांतता पसरवू नका. या लढ्याचा ऐतिहासिक विजय जवळ आला आहे. विजय नक्कीच होणार आहे. हा विजय मराठ्यांचा असणार आहे. महाराष्ट्रातील सर्वच मराठ्यांना शासनाने आरक्षण दिल्याशिवाय हा लढा थांबणार नाही. असे प्रतिपादन आयोजित सभेला जरांगे यांनी केले.


आज हिंगोली जिल्ह्याचा दौरा...


मनोज जरांगे हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी यवतमाळसह नांदेड जिल्ह्यामध्ये मराठा समाजातील आंदोलकांच्या भेटी घेतल्या. तर, आज मनोज जरांगे यांची हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा गावामध्ये सभा पार पडणार आहे. यासाठी 16 एकरवर तयारी पूर्ण करण्यात आली आहे. जरांगे आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणाला भेट देतील. त्यानंतर गिरगाव ते कुरुंदा अशी 300 मोटरसायकलची रॅली निघणार आहे. तसेच, कुरुंद येथे स्मशानभूमीमध्ये सुरू असलेल्या साखळी उपोषणाला जरांगे भेट देतील. त्यानंतर 16 एकरवर तयार करण्यात आलेल्या मैदानावर आयोजित एल्गार सभेला मनोज जरांगे संबोधित करतील. या सभेला अंदाजे 25 ते 30 हजार मराठा बांधव उपस्थित राहतील असा आयोजकांचा अंदाज आहे. ही सभा झाल्यावर मनोज जरांगे वसमतहून परभणीकडे रवाना होणार आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maratha Reservation: मराठा कुणबींचीच पोट जात, पुराव्यांची गरज नाहीच; मनोज जरांगेंचा नवा डाव अन् सरकारवर थेट घाव