बीड : काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला (Vaidyanath Sahakari Sakhar Karkhana) जीएसटी (GST) विभागाने कर चुकवल्याप्रकरणी नोटीस पाठविली होती. यानंतर मुंडे समर्थक अस्वस्थ झाले असून, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी उभा केलेला वैद्यनाथ कारखाना वाचविण्यासाठी मुंडे समर्थक पुढे आले आहेत. विशेष म्हणजे मुंडे समर्थकांसह उसतोड कामगारांनी एकत्र येत लोकवर्गणी गोळा करायला सुरवात केली आहे. आतापर्यंत लाखो रुपये जमा करण्यात आले असून, ही रक्कम दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंकडे सुपुर्द करण्यात येणार आहे.


भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडे जीएसटी विभागाची 19 कोटी रुपयांची थकबाकी असून, कारखाना सील करण्यात आला आहे. यापैकी काही साहित्याचा लिलाव केला जाणार आहे. आता याच 19 कोटीच्या रकमेसाठी कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांना मदत करायला सुरुवात केली आहे. 11 लाख रुपयांची मदत पंकजा मुंडे यांना देणगीच्या स्वरूपात देण्यात आली असून, दुसरीकडे आष्टी तालुक्यातल्या काशेवाडी ग्रामस्थांनी देखील वैद्यनाथ कारखान्याच्या मदतीसाठी गावांमध्ये लोकवर्गणीतून 7 लाख 20 हजार रुपये जमा केले आहेत.


मागील दोन वर्षापासून वैद्यनाथ कारखाना गाळप अभावी बंद असून, त्यातील बॉयलर हाऊस व इतर साहित्य 19 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी लिलावात काढला जाणार आहे. तर, याबद्दल सांगताना पंकजा मुंडे यांनी मी आर्थिक अडचणीत असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. त्यानंतर आता कार्यकर्ते आणि ऊसतोड मजूर यांनी पंकजा मुंडे यांना मदत करण्यास सुरुवात केली आहे. जीएसटीचे 19 कोटी परत करण्यासाठी पंकजा मुंडे यांना देणगीच्या स्वरूपातून आता पैसे जमा होताना पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या दसरा मेळाव्यात सुद्धा पंकजा मुंडे यांच्या वतीने सहकारी साखर कारखान्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मुंडे समर्थक देणार असल्याची चर्चा आहे. 


मुलीच्या लग्नाचे पैसे देणगीत दिले...


बीडसह राज्यातील प्रत्येक भागात मुंडे समर्थक आहेत. मुंडे कुटुंबाला मानणाऱ्यांची संख्य मोठी आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांच्या संकटाच्या काळात त्यांना मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहे. दरम्यान, एका बापाने आपल्या मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले 11 लाख रुपये वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी देणगीत दिले आहे. "वैद्यनाथ" साठी नव्हे तर गोपीनाथ मुंडे या नावासाठी मी माझ्या मुलीच्या लग्नासाठी सांभाळून ठेवलेली 11 लाख रुपयांची रक्कम माझी जबाबदारी म्हणून देत आहे. मुलगी ऊच्च आधिकारी झाली आहे. त्यामुळे हे पैसे देत असल्याचे राजाभाऊ दगडखैर यांनी म्हटले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Vaidyanth Sakhar Kharkhana : पंकजा मुंडे यांना जीएसटी विभागाचा पुन्हा झटका, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची 19 कोटींची मालमत्ता जप्त