बीड : प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाची सुपारी ठरली, तारीख ही ठरली. मात्र ऐनवेळी इंदुरीकर महाराजांनी कीर्तनाला नाकार दिल्याने संपूर्ण गावच त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्यात आलं होतं.
बीड तालुक्यातील कळसंबर गावात इंदुरीकर महाराज यांनी 19 ऑगस्ट ही तारीख किर्तनासाठी घेतली होती. गावकऱ्यांनी वर्गणी करून एक ते दीड लाख रुपये जमा केले. किर्तनाच्या कार्यक्रमाची जंयत तयारी केली. मंडप सजला, भजनी मंडळी गावात आले, जाहिरात झाली. मात्र ऐनवेळी इंदुरीकर महाराज यांनी आपण किर्तनासाठी येऊ शकत नाही असं सांगितलं आणि सपूर्ण गाव संतापलं.
एवढा खर्च करून कीर्तनाची तयारी केली, पण आजारी असल्याचं कारण सांगितल्यानं गावकऱ्यांनी रुग्णालयात घेऊन जातो असं देखील त्यांना सांगितलं. पण इंदुरीकर आले नाहीत यामुळे संतप्त झालेल्या कलसंबर गावच्या3 नागरिकांनी आपली फसवणूक झाली म्हणून इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करा या मागणीसाठी नेकनूरच्या पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.
नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असलेले इंदुरीकर महाराज हे आता वेगळ्याच कारणाने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. तारीख घेऊन कीर्तनाला न हजर राहिल्याने संतापलेल्या गावकऱ्यांनी त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करा अशी मागणी पोलिसात केली. त्यानंतर इंदुरीकर महाराजांनी आपल्या लोकप्रियतेचा असा गैरफायदा घेऊ नये अशा प्रतिक्रिया सर्व स्तरातून येऊ लागल्या आहेत.
या आधीही आठवडाभराचे कार्यक्रम रद्द
या आधीही इंदुरीकर महाराजांची तब्येत बिघडल्याने त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. मे महिन्यातील ही गोष्ट असून त्यावेळी इंदुरीकर महाराजांनी पत्र लिहून आपली भूमिका मांडली होती. ते म्हणाले होते की, प्रकृती अस्वास्थाच्या कारणास्तव डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती सांगितली आहे. त्यामुळं२३ ते ३० मे पर्यतचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. इच्छा असूनही कार्यक्रमात येऊ शकत नाही, त्यामुळे कार्यक्रमाच्या संयोजकांची, आयोजकांची गैरसोय होत आहे. त्याबद्दल रद्द करण्यात येत आहे. वैद्यकीय उपचारानंतर पुन्हा आपल्या सेवेत पूर्व नियोजित कार्यक्रम पार पडतील. आपल्याला होणार्या गैरसोयीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.
महत्त्वाच्या बातम्या: