बीड : काही दिवसापूर्वी बीड (Beed) तालुक्यातल्या बक्करवाडी येथील एका महिलेचा अवैध गर्भपात झाल्याने तिचा मृत्यू झाला होता ही घटना ताजी असतानाच परळीत ही एका विवाहित महिलेचा गर्भपात तिच्या इच्छेविना करण्यात आला होता. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. मात्र बीड मधील अवैध गर्भपाताच्या प्रकरणावरून चांगलीच खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं.
गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी बीड जिल्ह्यातील अवैध गर्भपाताच्या प्रकरणी विधीमंडळात आवाज उठवणे सदरचे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे, यात आणखी तपास करावा अशी मागणी केली असता आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी याप्रकरणाचा पुन्हा एकदा विशेष पथकामार्फत तपास केला जाईल तसेच जलदगती न्यायालयात हे प्रकरण चालवले जाईल अशी घोषणा केली. मात्र याचवेळी बोलताना तानाजी सावंत यांनी गर्भलिंग निदान आणि गर्भपाताबाबत बीड जिल्हा फेमस आहे असे वक्तव्य केल्यानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला. उध्दव ठाकरे यांच्या शिवसेना आमदारांनी यावर आक्षेप घेतला. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट या वक्तव्यावरून आमने सामने आले. यावेळी अजित पवार यांनी मध्यस्थी करत फेमस हा शब्द कामकाजातून वगळावा अशी मागणी केली.
बीड तालुक्यातल्या बक्करवाडीमध्ये शितल गाडे या 30 वर्षीय महिलेचा गोठ्यामध्ये गर्भपात करताना 5 जून रोजी मृत्यू झाला होता. या घटनेने अवघा जिल्हाच नाही तर महाराष्ट्र हादरून गेला होता. या प्रकरणात काही जणांना अटक करून त्यांच्यावर खटलाही दाखल करण्यात आला आहे. बक्करवाडी येथील अवैध गर्भपातामुळे झालेला मृत्यू या प्रश्नावर उत्तर देताना सभागृहात शिवसेनेच्या दोन्ही गटातल्या आमदारात खडाजंगी झाली. गर्भपाताच्या घटनांमुळे बीड जिल्हा हा फेमस (लोकप्रिय) आहे, असं उत्तर तानाजी सावंत यांनी दिलं, पण फेमस म्हणजे लोकप्रिय या शब्दावर ठाकरे गटातले आमदार सुनिल प्रभू यांनी तीव्र आक्षेप घेतला. यानंतर सावंतांच्या मदतीला शंभूराज देसाईही उठले, अजित दादांनी यात हस्तक्षेप करत फेमस हा शब्द बीड जिल्ह्याचा अपमान करणारा असून तो कामकाजातून वगळण्यात यावा अशी सूचना केली, या सूचनेचा विचार केला जाईल असं आश्वासन विधानसभा अध्यक्षांनी दिलं.
आमदार सोळंकेंनीही उपस्थित केला प्रश्न
या प्रकरणात एमबीबीएस असलेला डॉक्टर सहभागी आहे का? असा प्रश्न माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी उपस्थित केला. याला उत्तर देताना सावंत यांनी नाही असे उत्तर दिले. परंतु पोलिस तपासात औरंगाबाद येथील सतिष सोनवणे हा एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. हे समोर आलेले आहे. तर आमदार शेलार यांच्या प्रश्नावर आरोग्यमंत्री सावंतांनी विशेष पथकामार्फत चौकशी करण्याची घोषणा केली.
मुंदडा म्हणाल्या, मनिषासारख्या आणखी किती एजंट?
बीडच्या गर्भपाताचे प्रकरण आज विधीमंडळात चांगलेच तापले. या प्रकरणात केजच्या आमदार नमिता मुंदडा याही बोलल्या. जालना व औरंगाबादमधील शिकाऊ डॉक्टराने गेवराईत येवून अनेकदा गर्भलिंगनिदान केल्याची कबुली पोलिसांना दिली. परंतु ज्यांचे निदान झाले आहे त्या महिला कोण? त्याचे पुढे काय झाले? मनिषा सानप सारख्या आणखी किती एजंट आहेत? याचा तपास पोलिसांनी लावलेला नाही. यासारख्या अनेक मुद्यावरून आमदार मुंदडा यांनी गृहविभागात तक्रार केली.