Indurikar Maharaj : शासकीय कर्मचाऱ्यांची बुद्धी पाहूनच पगार ठरवा, असं वक्तव्य प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी केलेय. जळगाव शहरातील पिंपळा येथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने कीर्तनाचा  कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी इंदोरीकर महाराज उपस्थित होते.  शासकीय कार्यपद्धती, अधिकारी व त्यांची वेतनश्रेणी यावरुन इंदोरीकर महाराज यांनी यावेळी लक्ष वेधले. ते म्हणाले की, 'जे काम करत नाही त्यांचा पगार जास्त आणि जे काम करतात त्यांना पगार कमी आहे. विभागाने जानेवारी महिन्याच्या पहिल्या तारखेला कर्मचाऱ्यांची बुद्धी मोजली पाहिजे व त्यानुसार पगार ठरवला पाहिजे, असे वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी केलेय.


यावेळी मोबाईलच्या अति वापरामुळे होणाऱ्या मुलाच्या नुकसानावरही इंदोरीकर महाराज यांनी पाल्य आणि पालकांना झापले. ते म्हणाले, मोबाईलच्या अतिरेकामुळे शाळकरी विद्यार्थी शिक्षणापासून दुरावत चालले आहेत. त्याचे दुष्परिणामही समोर येत आहेत. अल्पवयीन मुली पळून जात असल्याचे उदाहरण देत त्यांनी  उपस्थितांचे लक्ष वेधले. तरुण पिढी दारूच्या आहारी इतकी गेली आहे की त्यामुळे दारूचा खप वाढला आहे. भविष्यात या तरुणांना लग्नासाठी मुली मिळणार नाहीत, अशी मिश्किल टिप्पणीही यावेळी इंदोरीकर महाराजांनी केली.



मोबाईलचा अति वापरामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. विद्यार्थी शिक्षणापासून दुरावले आहेत. मोबाईलच्या अतिवापराचचे भविष्यात मोठे दुष्परिणाम पाहायला मिळू शकतात, यावरून इंदोरीकर महाराजांनी तरुणांसह त्यांच्या पालकांची चांगलीच कान उघाडणी केली. ते म्हणाले की, आजच्या महाविद्यालयीन तरुणांबरोबरच विद्यार्थीही मोबाईल व्यसनाच्या आहारी गेले आहेत. शाळकरी फेसबुक इंस्टाग्राम सोशल मीडिया सारखा माध्यमांचा वापर केला जात आहे.  यासर्व गोष्टींचा परिणाम मुलांच्या संस्कारावर पडला असून त्यातून विपरीत घटना घडत आहेत. याच बाबींना अनुसरून इंदोरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनातून प्रबोधन करत विद्यार्थी तरुणांसह त्यांच्या पालकांचे लक्ष केले.


कोरोना काळात पोलीस होते म्हणून आपण सुरक्षित राहू शकलो. कोरोना काळात पोलिसांची कामगिरी मोलाची आहे. पोलिसांचे कार्य महान आहे, असे म्हणत इंदोरीकर महाराजांनी पोलीस विभागाचे कौतुक केले.