Chitra Wagh vs Uorfi Javed : भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी बीड (Beed) दौऱ्यातील पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा अभिनेत्री उर्फी जावेदवर (Uorfi Javed) हल्लाबोल केला. चार भिंतींच्या आत काहीही कर, पण बाहेर उघडं-नागडं फिरु देणार नाही, हा समाजस्वास्थ्याचा विषय आहे. स्वातंत्र्याच्या नावावर स्वैराचार खपवून घेणार नाही, अशी ठाम भूमिका चित्रा वाघ यांनी मांडली. आज उर्फी जावेद मुंबईत नंगानाच घालतेय, उद्या बीडच्या चौकात उघडं-नागडं फिरलं तर चालेल का? असा सवाल चित्रा वाघ यांनी यावेळी उपस्थित केला. 
 
उर्फी जावेदने ट्वीट करुन चित्रा वाघ यांना डिवचलं होतं. मेरी डीपी इतनी ढासू, चित्रा मेरी सासू असं ट्विट उर्फीने केलं होतं. त्याबाबत विचारलं असता, चित्रा वाघ म्हणाल्या, "ते तुम्ही त्यांना विचारा. मी हे समाजासाठी करत आहे. या विकृती हटल्या पाहिजेत यासाठी माझा लढा सुरु आहे. आज मुंबईत नंगानाच करतेय, उद्या बीडच्या चौकात करेल हे तुम्हाला मान्य आहे का? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत हा नंगानाच चालणार नाही ही माझी भूमिका समाजस्वास्थ्याची आहे. हे राजकारण नाही. मला नोटीस पाठवली त्याचं दु:ख नाही. मी त्याला उत्तरही पाठवलं आहे. पण समाजस्वास्थ्यासाठी काम करणाऱ्या महिलेला घेरण्याचा प्रयत्न सुरु आहे. उद्या दुसरी महिला लढण्यासाठी कशी उभी राहिल? मला काहीही फरक पडत नाही, कुणी कितीही काहीही बोलू द्या. हा नंगानाच चालू देणार नाही ही माझी ठाम भूमिका आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या.


महाराष्ट्रातून विकृती हटवण्याची मागणी


माझे भांडण विकृतीविरुद्ध आहे. सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घालून येणे हे आम्ही खपवून घेणार नाही. बोलणाऱ्यांना थोड्या लाजा वाटल्या पाहिजे, व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून कपडे घालायचं नाही काय?  मला घाणेरड्या पद्धतीने घेरले जात आहे.  या विकृतीला महाराष्ट्रातून हकलले पाहिजे, असं चित्रा वाघ म्हणाल्या.  


आधी कपडे घाला, मग कपड्यांवर बोला 


राजकारणाचा संबंध नसताना आमच्या मुलांचे फोटो व्हायरल केले. उर्फी प्रसिद्धीसाठी चिंध्या घालत आहे. इथे नागडा नाच खपवून घेतला जाणार नाही. फॅशनच्या नावाखाली हे आम्ही खपवून घेणार नाही.  उघडा नागडा फिरा म्हणून कोणताही धर्म सांगत नाही..आमचा विरोध धर्माला नाही. मीडिया चुकीच्या बातम्या दाखवीत आहे. समाज स्वास्स्थसाठी आवाज उठविताना विरोध होतोय, हे पुरोगामी महाराष्ट्राला लाजिरवाणे आहे.   असं चित्रा वाघ यांनी नमूद केलं. 


संजय राठोडांना विरोध कायम


दरम्यान, एका तरुणीच्या आत्महत्याप्रकरणात आरोप झालेले मंत्री संजय राठोड यांना आपला विरोध कायम असल्याचं चित्रा वाघ म्हणाल्या.  संजय राठोडांना मंत्री करताना मी बोलले होते, माझा विरोध होता. त्यांना क्लीनचिट ठाकरे सरकारने दिली. पुणे पोलिसांनी देखील क्लीनचीट दिलीय. मात्र मी ठाम आहे. माझा न्यायालयावर विश्वास आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या. 


VIDEO : चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद Chitra Wagh PC



संबंधित बातमी


चित्रा वाघ यांच्या धमकीमुळे उर्फी जावेदचं मॉब लिंचिंग होण्याची शक्यता, अॅड नितीन सातपुते यांची महिला आयोगाकडे तक्रार