Hingoli News : येत्या खरीप हंगामात (Kharif Season) पाण्याचा खंड व येणाऱ्या संकटाचा एकंदरीत विचार करुन नव्याने लागवड करण्यात येणाऱ्या पिकांची माहिती शेतकऱ्यांना (Farmers) ग्रामसभा घेऊन देण्यात यावेत, असे निर्देश कृषीमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिले आहे. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात खरीप हंगाम नियोजन व पीएफएमई आदी विषयाची आढावा बैठक अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी अब्दुल सत्तार बोलत होते. 


यावेळी बोलताना पालकमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, बोगस बियाणे व खतामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी. तसेच नव्याने सूचविलेल्या पिकाची व खते, बियाणाची माहिती देण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामसभेचे आयोजन करुन माहिती देण्यात यावी. शेतकऱ्यांच्या भावना समजून घेऊन त्यांच्या अडचणी सोडविण्याचे काम करावेत. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी पोखरा (नानाजी देशमुख कृषी संजीवनी) योजनेत गावे समाविष्ट करण्यासाठी माहिती घ्यावी. तसेच नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांना प्रगतीकडे नेण्याचे काम करावेत. शेतकऱ्यांच्या मुलाला शेतीविषयी माहिती मिळावी यासाठी प्राथमिक शाळेपासूनच शेतीची व शेतात वापरण्यात येणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या मुलाला शेतीविषयी माहिती मिळणार आहे. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कसा देता येईल यासाठी काम करावे, असे निर्देश सत्तार यांनी दिले. 


दिरंगाई केल्यास संबंधित बँक अधिकाऱ्यावर कार्यवाही करा


जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ जास्तीत शेतकऱ्यांना देण्यासाठी बँकेने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे. याबाबत दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावेत. याबाबत दिरंगाई केल्यास संबंधित बँक अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी. तसेच येत्या खरीप हंगामात पीक कर्ज वितरणासाठी बँकानी योग्य नियोजन करुन पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावेत. ज्या बॅंका शेतकऱ्यांना पिक कर्ज वितरीत करण्याबाबत टाळाटाळ किंवा दिरंगाई करत आहेत अशा बॅंकांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेवून त्यांना तात्काळ पिक कर्ज वितरण करण्याचे निर्देश देवून दररोज याबाबत पाठपुरावा करावा, अशा सूचनाही सत्तार यांनी यावेळी दिल्या.


कापूस, हळद, ऊस या पिकाची जिल्ह्यात वाढ 


यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे यांनी खरीप हंगाम नियोजनासाठी व राबवित असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. तसेच कापूस, हळद, ऊस या पिकाची हिंगोली जिल्ह्यात वाढ झाली आहे. चालू खरीप हंगामामध्ये सूर्यफूल व राजमा हे नवीन पिक घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी बैठकीस विविध विभागाच्या विभाग प्रमुख व विविध बँकेचे अधिकारी उपस्थित होते. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maharashtra Talathi : तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रही तलाठीमुक्त होणार?; कृषीमंत्री अब्दुल सत्तार काय म्हणाले?