Pankaja Munde: भाजप नेत्या आणि गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी आज भक्तीभगवान गडावर दसरा मेळावा घेतला. या मेळाव्यास राज्यभरातून गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे यांचे चाहते आले होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना संबोधित केलं. जेव्हा त्यांच्याकडे कोणतही पद नव्हतं, आमदारकी, खासदारकी नव्हती तेव्हा देखील माझ्यामागे तुम्ही असेच उभे राहिला, पुढेही असंच उभे राहा असं म्हणत त्यांनी जमलेल्या चाहत्यांना भावनिक साद घातली, त्याचबरोबर यावेळी त्यांनी साताऱ्यातील उदयनराजे भोसले यांच्या घरी गेल्यानंतरचा एक किस्सा देखील पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितला आहे. 


छत्रपती घराण्यांचं गोपीनाथ मुंडेवर प्रेम; पंकजा मुंडे यांनी सांगितला तो किस्सा 


दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, छत्रपती घराण्याने गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम केलं आहे. मी उदयनराजेंच्या प्रचाराला साताऱ्याला गेले होते. त्यावेळी त्यांनी मला त्यांच्या देवघरात नेलं. माझ्या हाताने आरती केली. त्यानंतर एका घरात नेलं तिथल्या एका खांबावर त्यांच्या वडिलांचा फोटो होता आणि शेजारीच गोपीनाथ मुंडे यांचा फोटो आहे. आम्ही जात बघून काम करत नाही.आम्ही काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभं राहतो आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. 


पंकजा मुंडे पुन्हा जाणार महाराष्ट्र दौऱ्यावर


आजच्या मेळाव्याला 18 पगड जातीचे लोक आले की नाही, नाशिकहून आले का, नगरहून आले का, बुलढाण्याहून आले का, आता कुठून कुठून आले गंगाखेड, जिंतूर परभणी नांदेड, अकोला अमरावती, राज्यभरातून बांधव आलेले आहेत. तुम्हाला मी दरवर्षा साष्टांग दंडवत घालते. कारण माझ्या बापाने मरताना माझ्या झोळीत तुमची जबाबदारी टाकली आहे. तुम्ही मला जिंकवलं मला इज्जत दिली. माझा पराभव झाल्यावर सर्वात अधिक इज्जत दिली. आता मी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात दौऱ्याला येणार आहे. आपल्याला आपला डाव खेळायचा की नाही.


मी तुमच्याकडे येणार आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात सगळीकडे येणार आहे. चांगल्या दिवसाची लोक वाट पाहत आहेत. त्यासाठी मी येत आहे. आता तयारी करा. कोयते घासून ठेवा. पाऊस पडला आहे. दिवाळी केल्याशिवाय ऊसतोडीला जाऊ नका. मी हरल्यामुळे नाराज होऊ नका, असं आवाहनही यावेळी पंकजा मुंडे यांनी केलं आहे.


 पंकजांनी व्यासपीठावर बोलावलं अन् सांगितलं हा माझा मुलगा


आमदार पंकजा मुंडे यांनी जमलेल्यांना संबोधित करताना त्यांच्या मुलाला समोर बोलावलं आणि त्याची ओळख यावेळी करून दिली आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, हा माझा मुलगा आर्यामान हा भगवान बाबाच्या दर्शनाला आलाय. यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या मुलाला पुढे बोलून आर्यमान याची ओळख करून दिली. यावेळी उपस्थितांनी एकच जल्लोष केला. 


हा माझ्यापेक्षा फार उंच पण छोटासा आहे, आज भगवान बाबाच्या दर्शनाला आला आहे, तो मला फार प्रिय आहे, असं वाटतं असेल ना तुम्हाला, हे माझं लेकरू आहे म्हणून ते प्रिय  आहे, असं वाटतं असेल ना पण, मी त्याला सांगितलं आहे, तुझ्यापेक्षा जास्त मला हे लोक प्रिय आहेत. कारण माझ्यावर जीएसटीचा छापा पडला तर, या बह्हादरांनी माझ्यासाठी बारा कोटी जमा केले. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा माझ्या लेकरांनी जीव दिला. मी माझ्या लेकरांपेक्षा जास्त तुमच्यावर जीव लावते, आणि तुम्ही माझ्यावर, मला बास इतकंच पाहिजे, बाकी काही नको.