बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचा दावा करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. त्यांच्यावरती अनेक आरोप देखील करण्यात आले, या प्रकरणामुळे चर्चेत असलेले धनंजय मुंडे यांच्याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) मोठा निर्णय घेतला आहे. बीड प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांची चौकशी करण्याचे आदेश अजित पवारांनी दिल्याची माहिती आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये झालेल्या कामांची चौकशी केली जाणार आहे. नियोजन विभागाने तयार केलेली समिती याचा एका आठवड्यात अहवाल देणार असल्याची माहिती आहे. मागील दोन वर्ष धनंजय मुंडे (Dhananjay Munde) बीडचे पालकमंत्री होते. तसेच आता धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) आरोपांची चौकशी होणार असल्याची माहिती आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
तर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या आरोपावरील प्रशासकीय मान्यताची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जिल्हा नियोजन समिती चौकशी समितीला सादर करणार आहे. मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या आरोपावरील चौकशीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शासकीय समिती गठित केली आहे. याच समितीला आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जिल्हा नियोजन समिती या सगळ्या कामांच्या प्रशासकीय मान्यताची प्रत देणार आहे. 30 जानेवारी रोजी पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक पार पडली. या बैठकीनंतर बीड जिल्ह्यात जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत 2023-24 आणि 2024-25 या कालावधीत झालेल्या 877 कोटींच्या कामाच्या चौकशीसाठी त्रीसदस्य समिती स्थापन करण्यात आली. या समितीने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतल्यानंतर दोन वर्षांच्या काळात झालेल्या सर्व कामाच्या प्रशासकीय मान्यता मागविल्या आहेत, त्या प्रशासकीय मान्यता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जिल्हा नियोजन समिती चौकशी समितीला देणार आहे.
दरम्यान ही त्री सदस्य समितीचे अध्यक्ष धाराशिवचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर, मुंबईच्या अर्थ व सांख्यिकी विभागाचे अपर संचालक एम.के. भांगे हे सदस्य आहेत. तर जिल्हा नियोजन अधिकारी सुर्यवंशी हे सदस्या सचिव आहेत. या चौकशीमुळे आता पुन्हा मंत्री धनंजय मुंडेंना मोठा धक्का बसला आहे. धनंजय मुंडेंवरील (Dhananjay Munde) आरोपांची आता चौकशी होणार आहे. यासाठी ही समिती नेमण्यात आली आहे. अजित पवारांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. धनंजय मुंडेच्या चौकशीसाठी अजित पवारांनी पक्षांतर्गत समिती नेमली आहे. तसेच सुरेश धसांच्या 73 कोटींच्या आरोपांची चौकशी होणार आहे.