ठाणे : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Ahwad) यांनी पत्रकार परिषद सुरू असताना पोलीस खात्याचा एक व्यक्ती त्याचे गोपनीय पद्धतीने शुटींग करत असल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे, जितेंद्र आव्हाड यांच्या पत्रकार परिषदेवर गोपनीय विभागातील पोलिसांचे लक्ष आहे का, सरकारने त्यांना अशारितीने पाठवले आहे का, असा सवाल उपस्थित करत आमदार आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, ही बाब लक्षात येताच त्यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला आपल्या घरातच ठेऊन घेतले आहे. जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद सुरू असताना ठाण्याच्या एसबीचे (गोपनीय विभाग) पोलीस (Police) शूटिंग करत होते. त्यावरुन, पत्रकार परिषद सुरू असताना आव्हाड भडकले. तसेच, विरोधी पक्षातील नेत्यांवर पोलीस का वॉच ठेवत आहेत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
पोलिसांनी आमच्यावर वॉच ठेवण्यापेक्षा वाल्मिकी कराडवर वॉच ठेवावा. माझ्या खासगी घरात पत्रकार परिषद सुरू असताना पोलीस घुसतात कसे? सरकारला नक्की वॉच ठेवून काय करायचे आहे? अशी प्रश्नांची सरबत्ती आव्हाड यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या वरिष्ठांना फोनद्वारे केली. तसेच, आपल्या पोलीस कर्मचाऱ्याला मी घरातच ठेऊन घेत आहे, जोपर्यंत तुमचे वरिष्ठ अधिकारी इथं येऊन याबाबत खुलासा करत नाहीत, तोपर्यंत मी त्यांना सोडणार नाही. मग, रात्र झाली तरी चालेल, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांना दम भरला.
माझ्यापेक्षा वाल्मिक कराडवर वॉच ठेवायला हवा होता
हे धक्कादायक आहे, तो माणूस माझ्या घरामध्ये पकडला आलो. विरोधी पक्षाला काय जगू द्यायचे की नाही. एवढा वॉच ठेवायचा आहे, तर बीडमध्ये मर्डर झाल्यावर वाल्मिक कराडवर वॉच ठेवायला पाहिजे होता ना, लवकर सापडला असता, पोलिसांची लाज तरी राहिली असती, असे आव्हाड म्हणाले. हे आता आमच्यावरच वॉच ठेवत आहेत. हे सगळं तुमच्यासमोर घडलं आहे. हे काय बनाव वगैरे नाही, तुमच्या नजरेसमोर झालंय आणि हे मला माहित नव्हतं हे लक्षात आणून दिलेलं आहे, असेही आव्हाड पत्रकारांना उद्देशून म्हटले.
त्या गरिबाची नोकरी जायची
ज्या पोलीस कर्मचाऱ्याला पकडण्यात आलं, त्यांनी मला सांगितलं की वरिष्ठांनी मला हे सांगितलं आहे. त्यामुळे मी आलो. हे प्रकरण स्वतःला वाचवायला आणि त्यानंतर बोलतील आम्ही काय बोललो नव्हतो, तो स्वतः गेला आणि त्याला सस्पेंड करतील. त्या गरीबाची नोकरी जायची. जाऊद्या हे सगळं.. असेही आव्हाड म्हणाले.
पोलिसांनी नाकाबंदी कसली केली?
वाल्मिक कराडला अटक करण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी कसली केली, त्याने फोन करून सांगितलं की एक तास अगोदरच हजर होणार आहे. जर पुण्यात नाकाबंदी केली असती तर तो पुण्यात सापडला असता, कमीत कमी पोलिसांची लाज राहिली असती, असेही आव्हाड यांनी म्हटले.
मुंबईच्या डॉनलोकांपेक्षा कराडची जास्त चलती
मला कराडचं कौतुक याच्यासाठी वाटतं की, मी हे सगळं 1989 सालापासून बघतोय. दाऊद, छोटा राजन, बाबू देशी, अरुण गवळी ही मुंबईतली मोठी नावं आहेत. त्यांची एवढी चालत नाही, एवढी ह्या कराडची चालत आहे. त्याची ताकद काय आहे ते मला माहित नाही. अशी दादागिरी कोणाची चालली नाही, डायरेक्ट पोलीस स्टेशनच्या बाहेर दारातच आला. मुंबईमधल्या मोठ्या गँगवारला आख्खी मुंबईची इंडस्ट्रीयल लॉबी घाबरायची. मुंबईच्या पोलिसांवर ते घाबरायचे, पोलीस त्यांना पकडून घेऊन यायचे. एवढी पोलिसांची दादागिरी होती. पण, वाल्मिक कराडची पोलिसांपेक्षा जास्त दादागिरी दिसून आली, असेही आव्हाड यांनी म्हटले.