बीड : काँग्रेस हरलेले सैन्य आहे आणि शरद पवार (Sharad Pawar) तर त्याहीपेक्षा हारलेले आहेत, त्यामुळे तुम्ही आम्हाला सोबत घेतल्याशिवाय मोदींना हरवू शकणार नाही असं वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले. महाराष्ट्राचे सरकार कोण चालवतय हे कळायला मार्ग नाही असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारच्या कामावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रकाश आंबेडकर बीड येथे आयोजित जाहीर  सभेत बोलत होते.


काँग्रेसवाल्यांनी आमच्या नादाला लागू नये असा इशाराही आंबेडकर यांनी दिला. गोडसे, गोळवलकर, हेडगेवार यांचा विचार हवा की शाहू, फुले, आंबेडकर यांचा  विचार हवा हा मुद्दा लोकांपर्यंत पोचवणे गरजेचे आहे. तुम्ही वंचित बहुजन सोबत आघाडी करत नाहीत तोपर्यंत तुम्ही शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार पुढे नेत नाहीत हे स्पष्ट होते असं ते म्हणाले. 


प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशात धर्म धोक्यात नाही तर आरक्षणवादी धोक्यात आहेत. आदिवासी, दलित, गरीब मराठा अडचणीत आहेत. बिहारमधे जातीय जनगणना  झाली. त्यातून पुढे आलं की कुठलाही समाज 10 टक्क्यांच्या वर नाही. त्यामुळे सर्वांनी सहमतीने राहणे गरजेचे आहे. एका जातीवर अवलंबून राहता येत नाही हे यातून आपल्याला उमगते. आपली लोकशाही सहजीवनाची व्यवस्था आहे. 


Prakash Ambedkar On Maratha Reservation : मराठा समाजाच्या पदरात निराशाच पडणार


मराठा आरक्षणावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सरकारने आरक्षणासंदर्भात मराठा समाजाला जो शब्द दिला आहे तो शब्द सरकार पाळणार नाही. शेवटी मराठा समाजाच्या पदरामध्ये निराशाच पडणार. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकार गंभीर नसून सर्व काही आलबेल चालू  आहे. सत्तेत बसलेला मराठा हा निजामी मराठा आहे तर लढणारा मराठा हा रयतेमधला मराठा आहे. त्यामुळे लढणारा मराठा सत्तेत आला पाहिजे. आम्ही जर सत्तेत आलो तर आमच्याकडे मराठा आरक्षणाचा फॉर्मुला तयार आहे. 


विरोधकांच्या इंडिया आघाडीवर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काही पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडी स्थापन जरी केली असली तरी याच इंडिया आघाडीतील सर्व पक्ष हे चार राज्यात होत असलेल्या निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. महाराष्ट्रामध्ये देखील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकत्र असल्याचं दाखवत जरी असले तरी सरकार जाऊन एक वर्ष झालं तरी जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. युती करण्यासाठी ते आम्हाला पत्र पाठवतात. मात्र पत्र पाठवून युती होत नसते.


भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाल्या की, पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर भाजपने कारवाई केली असून त्या जर बहुजनांच्या नेते असतील तर त्यांनी बहुजनांचा पक्ष स्थापन करावा. मात्र त्या नथुराम गोडसेच्या विचारावर चालणाऱ्या पक्षामध्ये आहेत. त्यांच्यावर वारंवार होणाऱ्या कारवाया हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. त्यांनी जर विचारलं तर मी त्यांना सल्ला देईल. 


महाराष्ट्रातले सगळे उद्योग गुजरातमध्ये 


ज्यांना लोकांनी निवडून दिल तेच नेते आता या जनतेला विकायला निघाले आहेत असं म्हणत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्रातले सगळे उद्योग हे गुजरातमध्ये गेले आहेत. त्यामुळे गुजरात व्हायब्रंट हे मुंबईमध्ये होत आहे. प्रत्येक राज्याचे आपापले स्वातंत्र्य उद्योग धोरण असले पाहिजेत. त्याचा अधिकार त्या राज्याकडे सरकारने द्यायला पाहिजेत. मात्र सरकार असं न करता राज्यातले जे काही जुने आणि मोठे उद्योग आहेत ते बंद पाडत असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 


ही बातमी वाचा: