बीड : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरून पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. मराठा समाजाच्या पदरात निराशाच पडणार असून, सरकार दिलेला शब्द पाळणार नसल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी बीडमध्ये आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. 


मराठा आरक्षणावर बोलतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "आरक्षणासंदर्भात मराठा समाजाला सरकारने दिलेला शब्द सरकार पाळणार नसून, शेवटी मराठा समाजाच्या पदरामध्ये निराशाच पडणार आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकार गंभीर नसून, सर्वकाही अलबेल चालू असल्याची माहिती मिळाल्याच प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. सत्तेत बसलेला मराठा हा निजामी मराठा आहे. तर, लढणारा मराठा हा रयतेमधला मराठा आहे. त्यामुळे लढणारा मराठा सत्तेत आला पाहिजे. आम्ही जर सत्तेत आलो तर आमच्याकडे मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. दरम्यान याच पत्रकार परिषदेमध्ये भाजपसह इंडिया आघाडीवर देखील त्यांनी जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राचे सरकार कोण चालवतय हे कळायला तयार नाही असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या कामावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.


इंडिया आघाडीवर टीका...


पुढे बोलतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "काही पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडी स्थापन जरी केली असली, तरी याच इंडिया आघाडीतील सर्व पक्ष हे चार राज्यात होत असलेल्या निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकत्र असल्याचं दाखवत आहे. मात्र, सरकार जाऊन एक वर्ष झालं तरी जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. युती करण्यासाठी ते आम्हाला पत्र पाठवतात. मात्र, पत्र पाठवले आणि युती होत नसते असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीवर देखील जोरदार टीका केली आहे.


पंकजा मुंडे नथुराम गोडसेच्या विचारावर चालणाऱ्या पक्षामध्ये


पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर भाजपने कारवाई केली असून, त्या जर बहुजनांच्या नेते असतील तर त्यांनी बहुजनांचा पक्ष स्थापन करावा. मात्र, त्या नथुराम गोडसेच्या विचारावर चालणाऱ्या पक्षामध्ये आहेत. त्यांच्यावर वारंवार होणाऱ्या कारवाया हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. त्यांनी जर विचारलं तर मी त्यांना सल्ला देईल, असे देखील प्रकाश आंबेडकर मिश्किलपणे म्हणाले आहेत.


महाराष्ट्रातले उद्योग हे गुजरातमध्ये


ज्यांना लोकांनी निवडून दिल तेच नेते आता या जनतेला विकायला निघाले आहेत. महाराष्ट्रातले सगळे उद्योग हे गुजरातमध्ये गेले आहेत. त्यामुळे, गुजरात व्हायब्रंट हे मुंबईमध्ये होत आहे. प्रत्येक राज्याचे आपापले स्वातंत्र्य उद्योग असले पाहिजेत आणि त्याच्या अधिकार त्या राज्याकडे सरकारने द्यायला पाहिजेत. मात्र, सरकार असं न करता राज्यातले जे काही जुने आणि मोठे उद्योग आहेत ते बंद पाडत असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Breaking News: मराठा आरक्षण समिती आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर, छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार बैठक