बीड : अनेकदा ओळखीच्या लोकांना मदत म्हणून आपण उधार पैसे देत असतो. मात्र, बीडमध्ये एका तरुणाला आपल्या मित्राला पाच लाख रुपयांची मदत करणं चांगलंचं महागात पडले आहे. कारण, उधार दिलेले पाच लाख रुपये परत मिळत नसल्याने हतबल झालेल्या या तरुणाला चक्क वकिलीचं शिक्षण घ्यावे लागले. तसेच वकील झाल्यावर स्वतः न्यायालयात केस लढवून त्याने आपले उधारीचे पाच लाख परत मिळवत केस जिंकली. या आगळ्यावेगळ्या प्रकरणाची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे. 


त्याचं झाले असे की, सागर नाईकवाडे यांनी त्यांचा मित्र जावेद रहीम सय्यद याला 2015 साली त्याची कौटुंबिक आणि व्यावसायिक अडचण असल्यामुळे पाच लाख रुपये उसने दिले होते. वर्षाखेरीस हे पाच लाख रुपये परत देण्याचा वादा जावेदने सागर याच्याकडे केला होता. मात्र, वारंवार पैशाची मागणी करून देखील जावेदकडून पैसे मिळत नसल्याने सागर नाइकवाडे यांनी त्याच्याकडे पैशाचा तगादा लावला. त्यानंतर जावेद सय्यद याने पाच लाख रुपयांचा चेक सागर नाईकवाडे यांना दिला. पुण्यातल्या कोथरूड शाखेचा हा पाच लाख रुपयाचा चेक सागर नाईकवाडे यांनी बँकेत टाकला असता, बँकेकडून अपुरी रक्कम या शेऱ्यासह तोच चेक परत पाठवण्यात आला. त्यामुळे या दोघांच्या मैत्रीमध्ये व्यवहारामुळे फूट पडली. 


अडचणीत असलेल्या मित्राला पाच लाख रुपये देणारे सागर नाईकवाडे अडचणीत सापडले होते. जावेदला दिलेले पाच लाख रुपये आता कसे परत मिळवायचे असा प्रश्न त्यांना पडला होता. चेक बाऊन्स झाल्यावर सागर नाईकवाडे यांनी जावेदला पाच लाख रुपये परत मिळावे, यासाठी कायदेशीर नोटीस पाठवली. तसेच, बीडच्या प्रथमवर्ग न्यायदंड अधिकारी यांच्या न्यायालयात हे प्रकरण सुरू झालं. दरम्यान याच काळात आपली बाजू मांडण्यासाठी आणि आपले पाच लाख परत मिळवण्यासाठी नाईकवाडे यांनी वकिलीचे शिक्षण म्हणजेच एलएलबीसाठी प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण करून त्यांनी बीडच्या प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर आपली बाजू भक्कमपणे मांडली. यावेळी नाईकवाडे यांच्यावतीने न्यायालयासमोर सादर केलेली कागदपत्रे, पुरावे व केलेल्या युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी जावेद यास उसने घेतलेल्या पाच लाख रुपयांची रक्कम, तसेच तीन लाख रुपये दंड व सहा महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


जिद्दीला पेटले अन्...


सागर नाईकवाडे आणि जावेद यांच्यात चांगली मैत्री होती. त्यामुळे मित्र अडचणीत असल्याचे समजल्यावर त्याला मदत म्हणून नाईकवाडे यांनी अडचणीत पाच लाखांची मदत केली. पण, पुढे जावेदकडून ठरलेल्या वेळेत पैसे देणे झाले नाही. अनकेदा मागणी करून देखील पैसे आले नाही. त्यामुळे त्यांनी जावेदने दिलेला चेक बँकेत टाकला, मात्र त्यात देखील पैसे नव्हते. त्यामुळे मित्राने आपली फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. शेवटी जिद्दीला पेटलेल्या नाईकवाडे न्यायालयाय धाव घेतली आणि सोबतच स्वतः वकिलीचे शिक्षण घेतलं. आपली बाजू न्यायालयात मांडली आणि केस जिंकली सुद्धा. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Beed Accident : शैक्षणिक कर्जासाठी बँकेत गेली, घरी परतताना अपघातात जागीच मृत्यू; स्वातीचे मेडिकलचे स्वप्न अपूर्ण