बीड: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने जुन्या कुणबी नोंदी (Kunbi Records) शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे आता मराठा समाजातील अनेक जुन्या कुणबी नोंदी समोर येत आहे. मात्र, बीड जिल्ह्यात समोर आलेल्या एका घटनेने प्रशासनासमोर नवा पेच उभा राहिला आहे. कारण दोन सख्ख्या बहिणींचे वेगवेगळ्या नोंदी आढळून आल्या आहेत. एका बहिणीच्या टीसीवर मराठा आणि दुसऱ्या बहिणीच्या टीसीवर कुणबी अशी नोंद आहे. 


रेकॉर्डवर कुणबी नोंद असलेल्या मराठा बांधवांना सध्या कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येत आहे. मात्र, असं असलं तरी दुसरीकडे काही ठिकाणी एकाच कुटुंबातील दोघांच्या वेगवेगळ्या असल्याचे समोर येत आहे. एकाची कुणबी आणि दुसऱ्याची मराठा अशा वेगवेगळ्या नोंदी आढळून येत आहेत. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाच्यासमोर एक नवा पेच उभा राहिला आहे. 


दोघींच्या प्रमाणपत्रावर जातीची नोंद वेगवेगळी 


बीड जिल्ह्यात राहणाऱ्या सोनिया बर्गे यांच्या शाळेच्या दाखल्यावर कुणबी अशी नोंद करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या दुसरी बहिण निकिता यांच्या शाळेच्या दाखल्यावर फक्त मराठा अशीच नोंद आहे. विशेष म्हणजे या दोन्ही बहिणी अमरावतीच्या एकाच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकल्या आहेत. मात्र, दोघींच्या प्रमाणपत्रावर जातीची नोंद वेगवेगळी करण्यात आली आहे. त्यामुळे आता दुसऱ्या बहिणीने कुणबी प्रमाणपत्र कसं काढायचं असा प्रश्न पडलाय.


यावर आता काय तोडगा काढणार? 


अमरावतीच्या सोनिया बर्गे यांचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला आणि त्यानंतर त्या बीडला आल्या. आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना विदर्भात कुणबी नोंदी आढळत असल्याने त्यांनी देखील शाळेचा दाखला काढला. यावेळी त्यांच्या दाखल्यावर कुणबी नोंद होती. पण, याचवेळी त्यांनी आपल्या बहिणीचा दाखला काढला असता, त्यावेळी त्यावर मराठा अशी नोंद आढळून आली आहे. त्यामुळे यावर आता काय तोडगा काढावा आणि नेमकी कोणती नोंद घ्यावी असा पेच प्रशासनाच्या समोर निर्माण झाला आहे. 


कुणबी, मराठा जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू


मराठवाडयातील मराठा समाजास मराठा - कुणबी, कुणबी मराठा, कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुरू करण्यात आली आहे. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडयातील मराठा समाजास मराठा - कुणबी, कुणबी मराठा, कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील नागरिकांकडे उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेजच्या आधारावर कुणबी मराठा प्रमाणपत्र वितरीत करण्यात येत आहेत. बीड जिल्ह्यात,  शिरूर,  गेवराई तालुक्यात विशेष शिबिर लावून जात प्रमाणपत्र उपलब्ध करण्याची कारवाई करण्यात येत असल्याची देखील माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


तर ठरलं! 15 नोव्हेंबरपासून मनोज जरांगेंची तोफ पुन्हा धडाडणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक