Beed News : बोहल्यावर चढण्याआधीच एका स्थापत्य अभियंत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) दुर्दैवी मृत्यू झाला. बीड (Beed) जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली. धीरज तट असे या तरुणाचे नाव असून 18 डिसेंबर रोजी त्याचा विवाह (Wedding) होणार होता. मात्र विवाहपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. धीरज हा स्थापत्य अभियंता होता. कुटुंबियांकडून त्याच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु होती. मात्र अचानक त्याचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


अंबाजोगाई शहरातील बँक कॉलनी परिसरात वसंत तट यांचे कुटुंब राहतं. त्यांना दोन मुली आणि धीरज हा एक मुलगा असा परिवार आहे. 26 वर्षांच्या धीरज तट हा स्थापत्य अभियंता आहे. त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण आंबाजोगाईमध्येच पूर्ण केले आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो नोकरीसाठी पुण्याला गेला होता.


लग्नाची तयारी सुरु असतानाच कुटुंबावर शोककळा
तीन महिन्यापूर्वी धीरजचं लग्न जमलं. मोठ्या धुमधडाक्यात साखरपुडाही झाला. या साखरपुड्याला कुटुंब आणि परिवारातील लोक मोठ्या आनंदाने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे याच साखरपुड्याच्या कार्यक्रमात पुढच्या महिन्यात म्हणजे 18 डिसेंबर रोजी लग्नाचा मुहूर्त काढला. लग्न काही दिवसांवर आल्याने तट कुटुंबीयांच्या घरात लग्नाची तयारी मोठ्या धुमधडाक्यात सुरु होते. एकुलत्या मुलाचा विवाह असल्याने हा सोहळा चांगला करण्याच्या दृष्टीने तट कुटुंबीय व्यस्त असतानाच धीरजला हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला आणित्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.


नातेवाईकांवर लग्नाऐवजी अंत्यसंस्काराला येण्याची वेळ
धीरज तट याचे मूळ गाव हे अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव आहे. त्याच गावी त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. खरंतर लग्नासाठी येणाऱ्या आप्तस्वकीय, नातेवाईकांना अंत्यसंस्कारासाठी येण्याची वेळ आल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.


कोल्हापुरात लग्नाच्या तोंडवर तरुणाचा मृत्यू
काही महिन्यांपूर्वी कोल्हापुरातही अशीच घटना घडली होती. लग्नाच्या तोंडावर 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. पन्हाळा इथला योगेश चंद्रकांत सणगर या तरुणाचा बोहल्यावर चढण्याआधीच 15 जुलै 2022 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. 22 जुलै 2022 रोजी त्याचं लग्न होतं. घरात लग्नाची घाई गडबड सुरु असताना 15 जुलै रोजी सकाळी त्याच्या छातीत दुखू लागलं. त्याला तातडीने कोडोली इथल्या खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. परंतु उपचार सुरु असतानाच पुन्हा एकदा हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने योगेशची प्राणज्योत मालवली. योगेश सणगर हा महावितरणमध्ये कामाला होता.


तरुणाईमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं
सध्या तरुणांमध्ये अचानक हृदयाचा झटका येण्याचं प्रमाण वाढताना दिसून येत आहे. बदलती जीवनशैली, जेवणाच्या अनियमितवेळा, अपुरी झोप आणि व्यायामाचा अभाव हे यामागील मुख्य कारणं आहेत. सध्याच्या बदलत्या युगात इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या वस्तूंकडे तरुणाई आकर्षित होऊ लागली आहे. सगळ्या गोष्टी एका जागीच सहज उपलब्ध होत असल्याने तरुणपिढी आळशी होत चालली आहे. याशिवाय अभ्यासाच्या ताणामुळे कमी वयात मुलं मादक पदार्थांच्या आहारी जाताना दिसत आहेत. कोकेनचं सेवन करणं हे हृदयविकारचा झटका येण्यामागील मुख्य कारण आहे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात विशिष्ट प्रकारचे बदल होऊ शकतात. ज्यामुळे तरुणांना अचानक आणि लवकर हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.


संबंधित बातम्या


Beed News : लग्नानंतर 21 दिवसातच तरुणाचा मृत्यू, पत्नी पोलिसांच्या ताब्यात, बीडच्या गेवराईमधील घटना