बीड : शहरातील एका वर्षांच्या चिमुकल्याची साडे तीन लाख रुपयांना विक्री करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. मात्र, पोलिसांना याची माहिती मिळताच बाळ विक्रीचा प्रयत्न हाणून पाडला होता. तसेच या प्रकरणी पाच लोकांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या पाचही जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच, त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.


माजलगाव तालुक्यातील एका गावातील महिलेला एक वर्षांचा मुलगा असून, ती पतिपासून विभक्त झालेली आहे. तिला सुखी संसाराचे स्वप्न दाखवून दुसरा विवाह करुन देण्याचे सांगत माजलगावातील छाया देशमुख व तिचा मानलेला भाऊ बुलढाणा जिल्ह्यातील किशोर भोजणे यांनी तिचे एक वर्षाचे बाळ विक्री केले होते. या प्रकरणात पोलिसांनी तपास केल्यावर गोव्यातील एक महिलेला साडेतीन लाखांत हे बाळ विक्री केल्याचे उघड झाले होते.


ललीता भिसे व दीपक गव्हाळकर यांनी या बाळाचा सौदा करून त्यांनी हे बाळ गोव्यातील  स्वप्नजा जोशी यांना विकले होते. यासाठी अप्पा राघोबा केरकार व नामदेव फोंड सावंत यांनी मध्यस्थी केली होती. जोशींकडून ललीता व दीपक यांनी साडेतीन लाख रुपये घेतले होते. यातील 50 हजार रुपये केवळ छाया व किशोर यांना दिले होते तर, 15 हजार रुपये अप्पा केरकार याला कमिशन म्हणून मिळाले होते. 


तिघांना गोव्यातून अटक 


या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी सुरुवातीला किशोर व छाया यांना अटक केली होती. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक पथकाने बाळ खरेदी करणारी स्वप्नजा जोशी आणि त्यासाठी मध्यस्थी करणारा अप्पा केरकार व नामदेव सावंत या तिघांना गोव्यातून अटक केली होती. त्यांच्याकडून बाळही ताब्यात घेतले होते. या सर्वांना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांना एपीआय सुरेखा धस यांनी पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने पाचही जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांची रवानगी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.


आरोपींचे नावं...


छाया श्रीराम देशमुख (वय 38 वर्षे, रा. शाहूनगर, माजलगाव), किशोर वासुदेव भोजने (वय 32 वर्षे, रा. बुलढाणा), ललिता मनोहर भिसे (वय 38 वर्षे, रा. हातकणंगले जि. कोल्हापूर), दीपक गव्हाळकर ऊर्फ गवळी (रा. बेळगाव, कर्नाटक) आप्पा राघोबा केरकार (वय 65 वर्षे), नामदेव फोडू सावंत (वय 60 वर्षे) व स्वप्नजा महादेव जोशी (वय 38 वर्षे, सर्व रा. सत्तरी, उत्तर गोवा) अशी आरोपींची नावे आहेत. यातील दीपक व ललिता हे दोघे फरार असून, त्यांचाही शोध पोलिस घेत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Beed Crime : दुसऱ्या पतीसोबत संसार थाटण्यासाठी पोटच्या मुलाला विकलं; बीड पोलिसांनी गोव्यातून केली चिमुकल्याची सुटका