बीड : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नावरून आता गावागावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी आता तरूण चांगलेच आक्रमक झाले असून त्याचा फटका आता करुणा शर्मा (Karuna Sharma) यांना देखील बसला आहे. बीडच्या (Beed) साक्षाळ पिंपरी येथे करुणा शर्मा या तुळजाभवानीचे दर्शन करण्यासाठी गेल्या असता यावेळी गावातील तरुणांनी त्यांना मराठा आरक्षणावरून विरोध करत त्यांची गाडी अडवली. करुणा शर्मा यांना तात्काळ गावाच्या बाहेर काढून दिलं.
मनोज जरांगे पाटील यांनी 22 तारखेला आपली भूमिका जाहीर केली आहे की कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांना गावात येऊ द्यायचं नाही, त्यांना गाव बंदी करा. तसेच गाव गावात साखळी उपोषण सुरू करा. जरांगेंनी असे आदेश दिल्यानंतर मराठा बांधवांनी गावागावत राजकीय पुढार्यांना बंदी घातल्याचं चित्र आहे. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावामध्ये प्रवेश नसेल असे फलक लावले आहेत.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी दिलेली 40 दिवसांची मुदत संपली आहे. त्यानंतर आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून गावागावात राजकीय पुढाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात येत आहे. या प्रश्नी मराठा समाजातील तरूण चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून येतंय.
धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळ्या आरोपांनंतर करुणा शर्मा चर्चेत आल्या होत्या. दरम्यान, गेल्यावर्षी त्यांनी बीड शहरात घर घेऊन, बीडमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. तर धनंजय मुंडे यांच्या विरोधात लढण्यासाठी मी कंबर कसली असून, आता बीडमध्ये घर घेतलं असल्याचं त्या म्हणाल्या होत्या. बीडचे लोकं माझ्यासोबत असल्याचं करुणा शर्मा म्हणाल्या होत्या. तेव्हापासून त्या बीडमध्येच राहत आहे. त्यानंतर करुणा शर्मा यांच्या कारवर हल्लाही झाला होता.
धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा वाद काय आहे?
करुणा शर्मांची बहीण रेणू शर्मा यांनी दोन वर्षांपूर्वी ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंधाबाबत प्रकरण समोर आले. याला धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत पुष्टी दिली, तसेच त्यांचे कधीपासून सहसंबंध आहेत या संदर्भात देखील खुलासा केला. यात करुणा शर्मा यांच्यापासून धनंजय मुंडे यांना दोन अपत्य असल्याचे पहिल्यांदा धनंजय मुंडे यांनी फेसबुकवरून जाहीर केले होते. काही दिवसानंतर रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतली.
ही बातमी वाचा: