बीड : बीडमध्ये (Beed) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेमध्ये तीन नवीन जिल्हा प्रमुखांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये परमेश्वर सातपुते, गणेश वरेकर आणि रत्नाकर शिंदे यांच्यावर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आलीये. दरम्यान पूर्वीचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांना माजलगाव आणि बीडच्या विधानसभा सहसंपर्कप्रमुख पदी नियुक्ती देण्यात आली. तसेच जर पक्षाने आदेश दिला तर विधानसभेच्या सहाही जागा स्वबळावर लढवण्याची तयारी असल्याचं जिल्हाप्रमुखांनी म्हटलं आहे. नवीन जिल्हा प्रमुखांची निवड झाल्यानंतर परमेश्वर सातपुते यांनी पत्रकार परिषद घेतली. दरम्यान आता शिवसेनेमध्ये आता कुठलेही गटतट राहिले नसून पक्षांना जर आदेश दिला तर बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा या स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत शिवसेनेचे पूर्व आणि पश्चिम असे दोनच जिल्हाप्रमुख होते. या दोन्ही जिल्हाप्रमुखांवर प्रत्येकी तीन मतदार संघाची जबाबदारी होती. परंतु मागील काही दिवसांपासून एक पद रिक्त होते. त्याच पार्श्वभूमीवर बीडचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्याकडेच संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली होती. दरम्यान पक्ष वाढीसाठी बैठका आणि गाठीभेटी सुरु होत्या. जगताप यांच्याकडून या सगळ्या गोष्टी करण्यात येत होत्या. दरम्यान त्यातच शुक्रवार 1 डिसेंबर रोजी नवीन जिल्हाप्रमुखांच्या निवडी करण्यात आल्या. याचवेळी पक्षाकडून तीन संपर्कप्रमुखांची देखील निवडले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरुन या निवडी जाहीर झाल्या असल्याची माहिती देण्यात आलीये.
कुणाकडे कशाची जबाबदारी
अनिल जगताप यांची सहसंपर्क प्रमुख म्हणून निवड करण्यात आलीये. त्यांच्याकडे बीड आणि गेवराई या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आलीये. बदामराव पंडित हे देखील सहसंपर्क प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळणार असून त्यांच्याकडे गेवराई आणि आष्टी या मतदारसंघाची जबाबदारी आलीये. बाळासाहेब अंबुरे यांच्याकडे केज मतदारसंघाची जबाबदारी सोपवली गेलीये. गणेश वरेकर हे जिल्हाप्रमुख झाले असून त्यांच्यावर बीड आणि माजलगावची जबाबदारी दिलीये. परमेश्वर सातपुते यांना देखील जिल्हाप्रमुखाची जबाबदारी पार पाडायची असून त्यांच्यावर गेवराई आणि आष्टी या मतदारसंघाची जबाबदारी आहे. रत्नाकर शिंदे यांच्यावर जिल्हाप्रमुख म्हणून केज आणि परळी मतदारसंघ आहे. निजाम शेख यांच्यावर शहर प्रमुखाची जबाबदारी दिली गेलीये. त्यामुळे आता बीडमधील ठाकरे गटाची जोरदार तयारी सुरु असल्याचं पाहायला मिळतंय.
हेही वाचा :
अजितदादा स्वार्थासाठी नाही तर विकासासाठी सत्तेत, कर्जतमधील शिबिरात छगन भुजबळांचा दावा