Beed Loksabha Election 2024 : बीडसह राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदानप्रक्रिया पार पडली. मतदान करण्यासाठी अनेकजण आपापल्या गावी गेले होते. पण मतदानाचा हक्क बजावयाला जातानाच एका युवाकावर काळाने घाला घातला. बीड लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अंगद रामहरी नागरे हा युवक पुण्याहून आपल्या गावी येत असताना घोडनदी शिरूर येथे गंभीर अपघात झाला. त्या अपघातामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर थेरला गावात शोककळा पसरली. बीड लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांनी अंगद नागरे यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचं सांत्वन केले.
थेरला येथील युवकाच्या निधनाबद्दल पंकजा मुंडे व्यथित ; घरी जाऊन केले परिवाराचे केले सांत्वन
मतदानासाठी येत असताना थेरला येथील युवक अंगद रामहरी नागरे याचे शिरूर घोडनदी जवळ रस्ता अपघातात दुःखद निधन झाले. ही बातमी समजल्यावर त्या व्यथित झाल्या. काल सर्वत्र मतदान सुरू असल्याने त्या जाऊ शकल्या नव्हत्या पण आज दुपारी त्यांनी थेरला येथे जाऊन नागरे परिवाराची भेट घेतली व सांत्वन केले. मतदानाच्या दिवशीच आणखी एक घटनेत येवलवाडी येथील सुनिता नागरगोजे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला, त्यांच्याही घरी जाऊन पंकजा मुंडेंनी परिवाराची भेट घेतली धीर दिला.
मतदानाच्या दुसर्याच दिवसापासून पंकजा मुंडे लागल्या कामाला
लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे लगेचच कामाला लागल्या. आज दिवसभर त्यांनी परळीतील ‘यशश्री’ निवासस्थानीं त्यांना भेटण्यासाठी जिल्हाभरातून आलेल्या भाजप-महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करत मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. तसेच निवडणूकीसाठी घेतलेल्या परिश्रमाबद्दल पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार मानले. आपला विजय निश्चित आहे. मतदार विकासाच्या बाजूने असून तुमच्या आशिर्वादानेच विकासासाठी काम करत राहिल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, दुपारी त्यांनी मतदानाच्या दिवशी अपघातात जीव गमावलेल्या युवकाच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
जिल्हाभरातील पदाधिकारी,कार्यकर्त्यांची घेतली भेट
बीड जिल्ह्यात सर्वत्र सोमवारी मतदानाची प्रक्रिया उत्स्फूर्तपणे पार पडल्यानंतर पंकजा मुंडे आज लगेचच पुन्हा कार्यकर्त्यांत मिसळल्या. सकाळपासून जिल्हाभरातून महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, परळी निवासस्थानी पंकजा मुंडे यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी पंकजा मुंडेंनी प्रत्येकाकडून मतदारसंघनिहाय आढावा घेत पदाधिकार्यांशी चर्चा केली. आपण सर्वांनी खूप चांगले काम केले. मतदानादिवशी प्रचंड उन्हात त्रास घेत बुथवर थांबलात, आपण घेतले’असे सांगत सर्वांचे आभार मानले. माझा विजय निश्चित आहे. समाजातील सर्व घटकांसाठी आपण काम करत राहणार आहोत. आपली लढाई कोणत्याही जातीच्या अथवा व्यक्तीच्या विरोधात नव्हती. जिल्ह्याच्या विकासासाठी आपण योगदान देत राहू. बीड जिल्ह्यातील जनता नेहमीच विकासाच्या बाजूने राहिली आहे.जातीपातीला त्यांनी कधीच थारा दिला नाही. या निवडणूकीतही तेच दिसले.जनतेचा आशीर्वाद मला निश्चित मिळेल अशा भावना याप्रसंगी व्यक्त केल्या.