Maharashtra Beed News : परतीच्या पावसाचा (Monsoon Retreat) मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून सोयाबीनसह (Soybeans) अन्य पिकांची प्रचंड नासाडी झाली आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फटका बसला आहे. दिवाळी तोंडावर असताना सगळं काही हातचं गेलं असून, सरकारची मदत मिळत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमधील जाधववाडी शिवारात नुकसानग्रस्त शेती पिकांची पाहणी केली. यावेळी आपल्या व्यथा सांगताना शेतकऱ्यांना अश्रू आणावर झाले.
पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची माहिती घेतली. यावेळी शेतीतील नुकसानीची माहिती देत असताना भारत जाधव नावाच्या शेतकऱ्याला अक्षरशः रडू कोसळले. "ताई, आमच्यावर आभाळच कोसळलयं. लई नुसकान झालयं..आता जीवाचं बरं वाईट केल्याशिवाय पर्याय नाही. या संकटातून आता तुम्हीच आम्हाला बाहेर काढा असं म्हणत हा शेतकरी ओक्साबोक्शी रडू लागला. पंकजा मुंडे यांनी त्याला धीर देत सावरले. असं काही करू नका..धीर धरा..सरकार नक्की मदत करेल, मी तुमच्या पाठिशी आहे असा विश्वास दिला.
शेतकरी हताश आणि निराश आहे. अशा संकटात त्याला आधार दिला गेला पाहिजे. नुकसान मोठे आहे. सरसकट पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी तसेच महामार्गाच्या लगत असलेल्या शेतात निकृष्ट नाली बांधकामामुळे शेतात पाणी साचून पिकांचे नुकसान झाले आहे, यात दोषी कंत्राटदारावर कारवाई व्हावी अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी माध्यमांशी बोलतांना केली. पीक विम्याच्या बाबतीत जिल्हयावर अन्याय होत आहे, पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावे. विमा कंपनीला सरकारच्या आदेशाचे पालन करावेच लागेल असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
दिवाळी कशी गोड होणार...
मराठवाड्यात जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली, त्यानंतर आता परतीच्या पावसाने उरल्यासुरल्या पिकांचं मातीमोल झाला आहे. अशात दिवाळी तोंडावर असून, सरकारची कोणतीही मदत बहुतांश शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे बळीराजांनी दिवाळी कशी साजरी करावी असा प्रश्न मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पडला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :