Marathwada Farmer Suicide: मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र काही थांबता थांबत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कारण सोमवारी एकाच दिवसात मराठवाड्यातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आलंय. विशेष म्हणजे यात दोन महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. औरंगाबादच्या सिल्लोड, बीडच्या गेवराई आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवलं आहे.


कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातील मोढा (खुर्द) येथील अल्पभूधारक शेतकरी बापूसाहेब महादू धांडे (वय 39 वर्षे) यांनी गळफास घेत आत्महत्या केली. बापूसाहेब हे शेतात असलेल्या एका वस्तीवर राहत होते. त्यांच्यावर बँक आणि बचत गटाचे कर्ज होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते.त्यामुळे कर्ज कसे फेडणार अशी चिंता त्यांना सतावत होती. त्यामुळे अखेर गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे. 


दुसऱ्या घटनेत बीडच्या गेवराई तालुक्याच्या कांबी मंझरा गावातील एका महिलेने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात सतत सुरु असलेल्या पावसाने पिकांचं मोठ्याप्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यामुळे हातचे पीक गेल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. दरम्यान या सर्व परिस्थितीला कंटाळून बीडच्या कांबी मंझरा गावातील अल्पभूधारक शेतकरी असलेल्या कविता बळीराम मुळे (वय 42 ) यांनी झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर आणखी एका घटनेत नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील गोरठा येथील महिला शेतकरी असलेल्या सुमनबाई पुंडलिक कोरेबोईनवाड (वय  45 वर्षे) यांनी देखील कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. 


गेल्या 9 महिन्यात 756  आत्महत्या...


गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.दरम्यान शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होतांना पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात गेल्या 9 महिन्यात 756 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात सर्वाधिक196 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्या आता चिंतेचा विषय बनला आहे. 


संबंधित बातमी...


Marathwada: राज्यात सत्तासंघर्ष सुरु असतांना गेल्या 9 महिन्यात 756 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन