Beed District News : ऊस तोडणीच्या पैशासाठी बीड जिल्ह्यातील (Beed District) मजुरांच्या मुलांना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऊसतोडीच्या उचलीचे पैसे शिल्लक राहिल्याचा दावा करत सोलापूर जिल्ह्यातील एका मुकादमाने बीडच्या ऊसतोड मजुरांच्या सहा मुलांना सोलापूरमध्ये कोंडून ठेवेले होते. दरम्यान चाईल्ड लाईनला याबाबत माहिती मिळताच पोलिसांच्या मदतीने या मुलांची सुटका करण्यात आली आहे. तसेच बीडमध्ये आणल्यानंतर या सहा मुलांना जिल्हा बाल समिती सदस्यांच्या मदतीने कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. 


अधिक माहिती अशी की, "बीडच्या केज तालुक्यातील शिंदी येथील एक कुटुंब आणि गेवराई तालुक्यातील दोन कुटुंबे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे ऊसतोडणीसाठी गेली होती. ऊसतोडणीचा हंगाम पूर्ण झाल्यानंतर ऊसतोड मुकादमाने मजुरांकडे पैसे शिल्लक असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांच्याकडून आणखी तीन महिने काम करुन घेतले. मात्र त्यानंतर देखील अजून पैसे शिल्लक असल्याचा मुकादमाने दावा केला. धक्कादायक म्हणजे पैसे द्या, अन्यथा तुमची मुलं आमच्याकडे ठेवा असे सांगितले. त्यानुसार ऊसतोड मुकादमाने तीन मुले आणि तीन मुलींना करमाळा तालुक्यातील कुंभेज येथे डांबून ठेवले.


समितीने पालिसांच्या मदतीने केली मुलांची सुटका... 


दरम्यान याबाबत शांताबाई वसंत माळी यांनी सोलापूरच्या चाईल्ड लाईनला या सर्व प्रकरणाची माहिती दिली. तसेच मुले डांबून ठेवले असून, त्यांची सुटका करण्याची मागणी केली.  या प्रकरणाची माहिती चाईल्ड लाईनने ही तात्काळ सोलापूरच्या बाल कल्याण समितीला दिली. त्यानंतर बाल कल्याण समितीने करमाळा पोलिसांना याची माहिती दिली. सोबतच बालकांची सुटका करण्याचे आदेशित केले. तर करमाळा पोलिसांना याची माहिती मिळताच महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी बालकांची सुटका केली. तसेच या मुलांना सोलापूर बाल कल्याण समितीपुढे सादर केले. त्यानंतर या मुलांना बीडमध्ये आणले. तसेच डांबून ठेवलेल्या बालकांना आई-वडिलांकडे सुपुर्द करण्यात आले आहे. यावेळी बीड जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे, सदस्य सुरेश राजहंस, प्रा. छाया गडगे, ॲड. संतोष वारे उपस्थित होते.


बालकांना आई-वडिलांकडे सुपूर्द 


ऊस तोडणीच्या उचलीचे पैसे शिल्लक राहिल्याचा दावा करत, एका मुकादमाने बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या सहा मुलांना सोलापूर जिल्ह्यातल्या कुंभेज येथे डांबून ठेवेले होते. याची माहिती बीड जिल्हा बालकल्याण समितीला मिळाल्यानंतर करमाळा पोलिसांच्या मदतीने या सहा मुलांची सुटका करण्यात आली आहे. या सहाही मुलांना जिल्हा बाल समितीच्या सदस्यांनी त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द केलं आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Beed Crime: "तुला माझा नवरा खूप आवडतो का?" म्हणत गावातील महिलेला पाजले विष; पोलिसांत गुन्हा दाखल