Beed Crime News : बीडच्या (Beed) अंबाजोगाई तालुक्यात दरोडा टाकून फरार झालेल्या गँगचा परभणी ते देगलूर असा 147 किमी पाठलाग करून बीडच्या गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकण्यात आल्या. दिवसा रेकी करायची आणि रात्रीच्या वेळी दरोडा टाकायचा, असा या गँगचा प्लॅन असायचा. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन. त्यांच्याकडून एका जीपसह 5 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. मारुती दुर्गाजी भोसले (वय 45), शिवाजी दुर्गाजी भोसले (40). तानाजी दुर्गाजी भोसले (37), बबन मारुती भोसले (वय 24) व बळीराम मारुती भोसले (वय 22) अशी पकडलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील वरवटी येथील योगेश्वर हॅचरीज प्रा.लि. या कंपनीचे सुरक्षा रक्षक विलास जाधव यांना हातपाय बांधून मारहाण करण्यात आली होती. तसेच याच कंपनीतील 380 किलो तांब्याची तार घेऊन दरोडेखोरांनी धूम ठोकली होती. याप्रकरणी 16 जून रोजी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान याच तपास करत असतांना हा गुन्हा परभणीच्या भोसले गँगने केल्याची टीप गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यामुळे मागील 15 ते 20 दिवसांपासून त्यांचा शोध बीड पोलिस घेत होते.
दरम्यान गुरुवारी या टोळीचा म्होरक्या हा परभणीतील घरी असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच बीड पोलिसांचे पथक रवाना झाले. परंतु, बीड पोलीस पोहचेपर्यंत मारुती आणि शिवाजी हे दोघे जीपमधून देगलूरला निघाले होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा तिथपर्यंत पाठलाग केला. तसेच खात्री पटताच दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या. त्यानंतर त्याच्या साथीदारांना देखील अटक करण्यात आली. तर ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षकसचिन पांडकर, कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकामध्ये पोलिस निरीक्षक संतोष साबळे, उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, मनोज वाघ, प्रसाद कदम, विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, सचिन आंधळे, अशोक कदम यांनी केली आहे.
दिवसा रेकी, रात्री कार्यक्रम
या टोळीतील आरोपींच्या पत्नी व इतर महिला या दिवसभर टोपले विकण्याचा बहाणा करून रेकी करायचे. तसेच ताब्यात घेण्यात आलेले आरोपी सुद्धा दुचाकीवर फिरून रेकी करायचे. तर बीडच्या वरवटी येथेही चोरी करण्यापूर्वी रात्रीच्या वेळी दोन वेळा रेकी करूनच तिसऱ्या वेळी दरोडा टाकण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: