बीड : शासकीय योजनेतून धारूर तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बोरवेल्स आणि विहिरीवर सौर पंप बसवले आहेत. मात्र, याच सौर पंपाचे पॅनल चोरणारी टोळी सध्या धारूर तालुक्यामध्ये सक्रिय झाली आहे. तसेच, गेल्या काही दिवसापासून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात लावण्यात आलेले सौर पंपाचे पॅनल चोरी झाल्याच्या तक्रारी पोलिसात दाखल झाल्या आहेत. धारूर तालुक्यातील आवरगाव येथील महादेव जगताप या शेतकऱ्यांच्या शेतात बसवलेल्या सर्व पॅनलच्या तब्बल अडीच ते तीन लाख रुपये किमतीच्या 18 प्लेट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. सोबतच, इतर शेतकऱ्यांमध्ये देखील आता सौर पंपाबद्दल चिंता निर्माण झाली असून, पोलिसासमोर देखील या चोरट्यांनी आव्हान उभ केल आहे.


बीडच्या धारूर तालुक्यामध्ये मुख्यमंत्री सोलार योजना, कुसुम सोलार योजना तसेच पंतप्रधान सोलार योजनेच्या माध्यमातून शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या शेतात असलेल्या विंधन विहिरीवर आणि बोरवेलवर सौर पंप बसवले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा विजेचा खर्च बऱ्यापैकी वाचला असला तरी, दुसरीकडे आता या चोरट्यांमुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. काही ठिकाणी सोलार प्लेट तर, काही ठिकाणी सोलार सिस्टिमचे स्टार्टर देखील चोरी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. 


शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी त्यासाठी या सौर पंप योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहेत. मात्र, चोरट्यांची नजर आता या सौर पंपाच्या प्लेटवर पडली आहे. त्यामुळे या चोरट्यांना तात्काळ पकडून या चोऱ्या थांबवण्याची विनंती पोलिसांकडे केली जात आहे. तर, दुसरीकडे शेतकऱ्यांना आता सौर पंपाची राखण करण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे. 


शेतकरी दुहेरी संकटात? 


यंदा मराठवाड्यातील अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, अशीच काही परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अनेक ठिकाणी पीक करपून जात आहे. एकीकडे पाण्याचे संकट असतानाच आता दुसरीकडे सौर पंप चोरीला जात असल्याच्या घटना समोर येत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून या चोरट्यांचा बंदोबस्त केला जाईल का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Crop Insurance Scam : बीडच्या पीक विमा घोटाळ्याचे कनेक्शन थेट तेलंगणापर्यंत; चक्क एमआयडीसीच्या जागेवर काढला विमा