Beed Crime News : भावकीतील वादामुळे होणारे भांडण अनेकदा आपण पाहत असतो, मात्र बीडमध्ये (Beed) सूडाच्या भावनेतून भावकीतील महिलेने चक्क चिमुकल्या बहीण व भावास उंदीर मारण्याचे विषारी औषध पाजून कायमचं संपवलं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. 29 डिसेंबर 2023 रोजी घडलेल्या या घटनेचा तब्बल 20 दिवसानंतर खुलासा झाला आहे. तनुजा (वय 2 वर्ष) व किशोर अमोल भावले (वय 13 महिने) अशी मयत चिमुकल्यांची नावे आहेत. स्वाती उमाजी भावले असे आरोपी महिलेचे नाव आहे. 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील पांढरवाडी येथील तनुजा आणि किशोर या बहीण-भावाला 29 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास अचानक उलट्या होऊ लागल्या होत्या. त्यामुळे नातेवाईकांनी दोघांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. 13 महिन्याच्या किशोर याला बीडच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, तर तनुजाला छत्रपती संभाजीनगरच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांवर उपचार सुरु असतानाच उपचारादरम्यान शनिवार 30 डिसेंबर रोजी मुलगी तनुजा हिचा तर मुलगा किशोर याचा 1 जानेवारी रोजी मृत्यू झाला. दोघांचाही अंत्यविधी पांढरवाडी येथे झाला. याप्रकरणात सुरूवातीला तलवाडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, पुढे हा खुनाचा प्रकार असल्याचे समोर आले. 


शेजारी महिलेच्या सांगण्यावरून केली हत्या...


एक ते दिड महिन्यापुर्वी शेजारी राहणाऱ्या सखुबाई ज्योतीराम भावले हिने आरोपी स्वाती हिचा सासरा सुखदेव भावले याने माझी लेक वैशाली हिला नांदु दिले नाही. मला त्याचा बदला घ्यायचा आहे असे म्हणून मयत मुलांची चुलती म्हणजेच मुलांना औषध देणारी आरोपी स्वाती हिला मुलांना औषध खावू घालण्यास सांगितले. मात्र, स्वातीने त्या महिलेला नकार दिला. त्यानंतर पुन्हा 15 दिवसांनी शेजारी राहणाऱ्या सखुबाई भावले हिने स्वातीला 'मी तुला चार लाख रूपये देईल, तेवढं काम कर, तुझा कोणाला संशय येणार नाही, तु असे केल्यास तुझी जाऊ येथे राहणार नाही, मग तु एकटीच इथे राहशील' असे सांगितले. त्यानुसार सखुबाई भावले आणि स्वाती भावले या दोघींनी संगनमताने कट रचला आणि 29 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास सखुबाई हिने आणून दिलेले उंदिर मारण्याच्या ट्युबमधील औषध स्वाती हिने बोटावर काढून तनुजा आणि किशोर या दोघांना चाटविले. त्यानंतर त्यांना उलट्या झाल्या आणि उपचार सुरू असतांना दोघांचा मृत्यू झाला. 


अन् मृत्यूचे खरे कारण समोर आले....


या प्रकरणात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, 19 जानेवारी रोजी मयत मुलांची चुलती स्वाती उमाजी भावले ही शेतात काम करत असतांना तिला कुणीतरी मारहाण केली. याविषयी नातेवाईकांनी तिच्याकडे विचारणा केली असता तिने किशोर आणि तनुजा यांच्या मृत्युच्या कारणावरुन मी कुणाला काही सांगू नये म्हणून शेजारी राहणाऱ्या सखुबाई ज्योतीराम भावले हीने दोन अनोळखी मुलांना मला मारहाण करण्यासाठी पाठवले होते असे कुटुंबियांना सांगितले. त्याचवेळी किशोर आणि तनुजा यांच्या मृत्यूचे खरे कारण समोर आले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Crime News : 'क्राईम पेट्रोल'चे 1300 हून अधिक एपिसोड पाहिले, मग प्रेयसीच्या मृतदेहाची विल्हेवाट; दोन वर्षानंतर आरोपीला अटक