बीड : गेवराई शहरापासून जवळच असलेल्या बागवान कब्रस्तानजवळ एका तरुणाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. त्याच मृतदेहाची उत्तरे तपासणी केल्यानंतर त्याचा खून (murder) झाल्याचे पोलीस तपासात उघड झालं. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपीला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे यातील मयत तरुणाच्या भावानेच आपल्या भावाचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. मनोहर विलास पुंड (वय 36 वर्ष रा. रंगार चौक, गेवराई ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, दर्शन पुंड असे खून करणाऱ्या लहान भावाचे नाव आहे.
गेवराई शहरापासून जवळच असलेल्या बागवान कब्रस्तान परिसरामध्ये एका पत्राच्या शेडमध्ये दर्शन पुंड आणि त्याचा मित्र आनंद बाबते यांच्यासह अन्य तीन साक्षीदारांनी मनोहर पुंड याला जबर मारहाण केली. त्यानंतर त्याचा खून केला. मनोहर याचा खून करुन हे सर्वजण घरी परतले. त्यानंतर या परिसरात मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या मृतदेहाची ओळख पटवत तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवला होता. त्या उत्तरीय तपासात मनोहर याचा खून झाल्याचं उघड झालं. त्यामुळे पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले आणि अवघ्या तीन तासांत खून करणाऱ्या आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयत मनोहर पुंड हा अनेक लोकांकडून पैसे घ्यायचा आणि दारु पिऊन घरी त्रास द्यायचा. मनोहरच्या या सर्व रोजच्या त्रासाला दर्शन कंटाळला होता. त्यामुळे दर्शन पुंड याने आपल्या मित्राच्या सहाय्याने मनोहर याला जबर मारहाण केली. यामध्येच त्याचा मृत्यू झाल्याची आरोपींनी कबुली दिली आहे. याप्रकरणी दर्शन पुंडच्या विरोधात गेवराई पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोजच्या त्रासाला कंटाळून केली मारहाण...
सोमवारी सकाळी शहराजवळ तरुणाला अमानुष मारहाण करुन त्याचा खून करण्यात आल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली असता हा मृतदेह मनोहर पुंडचा असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती मिळवली आणि त्याचा लहान भाऊ दर्शन पुंड याला घटनास्थळी बोलावले. मात्र, दर्शन घटनास्थळी येण्यास नकार देत होता. तसेच पोलिसांनी फिर्याद नोंदवण्यासाठी जवाब दे म्हटले तरी तो नकार देऊ लागल्याने पोलिसांना दर्शन पुंड याच्यावर संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता आपणच मित्रांच्या मदतीने मनोहरला मारहाण करुन हत्या केल्याची कबुली दिली. तर, माझा भावाने अनेक लोकांकडून पैसे घेतले होते. तसेच तो दारु पिऊन घरी येऊन नेहमी त्रास देत असे, यालाच वैतागून मी याची माहिती आरोपी माऊली आनंद बाप्ते (वय 30 रा. रंगार चौक) याला सांगितले. त्यानुसार माऊली याने त्याच्या अन्य तीन साथीदारांच्या मदतीने मयत मनोहर याला बागवान कब्रस्थान परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये घेऊन जात अमानुष मारहाण करुन जीवे मारल्याची कबुली आरोपी दर्शनने दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Beed: वीट डोक्यात मारून पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा; अंबाजोगाई सत्र न्यायालयाचा निकाल