बीड: बीड (Beed) जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील सातेफळ शिवारातील वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुराने वीट डोक्यात मारून पत्नीचा खून केला होता. याप्रकरणी निर्दयी पतीस दोषी ठरवून अंबाजोगाई अप्पर सत्र न्यायाधीश संजश्री घरत यांनी आरोपीस आजन्म सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना आणि फिर्यादीसह निम्मे साक्षीदार फितूर होऊनही सरकारी वकील लक्ष्मण फड यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे दोषी पतीला त्याच्या कृत्याची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे.
आश्रुबा गुलाब नरसिंगे (वय 35) असं गुन्हेगार पतीचं नाव आहे. आश्रुबा पत्नी दिपाली सह वीटभट्टीवर कामास होता. 31 जुलै रोजी आश्रुबाने दिपालीच्या डोक्यात वीट मारून तिचा खून केला आणि ‘मी दिपाली हीस विटेनं मारलं आहे, ती जिवंत आहे की मेली ते जावून पहा’ असं तिच्या चुलत्यास सांगितलं. विशेष म्हणजे खुनाच्या वेळी आश्रुबाची लहान मुलगी जवळच झोळीत झोपली होती, परंतु त्या चिमुकलीकडे पाहूनही तिच्या आईचा खून करताना निर्दयी आश्रुबाचे हात थरथरले नाहीत. याप्रकरणी दिपालीच्या आईच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात आश्रुबावर खुनाचा गुन्हा दाखल झाला. ग्रामीण पोलिसांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केलं.
डॉक्टर, पोलिसांच्या साक्षी ठरल्या महत्वाच्या
प्रकरणात शवविच्छेदन करणारे डॉ. रविकुमार कांबळे आणि तपासी अधिकारी श्रीनिवास भिकाने यांची साक्ष तसेच आरोपीच्या मोबाईल मधील व्हॉईस आणि व्हिडीओ रेकॉर्डिंगवरील पो. कॉ. खरटमोल यांची साक्ष महत्वाची ठरली.
निम्मे साक्षीदार फितूर
या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणीही नव्हते. सुनावणी दरम्यान एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले, त्यातील 4 साक्षीदार फितूर झाले. विशेष म्हणजे दिपालीची फिर्यादी असलेली आई आणि घरच्या लोकांनी देखील ऐनवेळी फितूर होत आरोपीच्या बाजूने साक्ष दिली होती. तसेच मयतेचा चुलता आणि पंच, साक्षीदार यांनी देखील साक्ष बदलून सरकार पक्षाच्या विरोधात साक्ष दिली होती.
सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला प्रभावी
या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील लक्ष्मण फड यांनी बाजू मांडली. दिपालीचा मृत्यू दणकट आणि बोथट हत्याऱ्याने मारहाण केल्याने झाला आहे. मयतेच्या मरण्याच्या वेळी ती आश्रुबा सोबत विटभट्टीवर कामास होती आणि ते दोघे एकाच रुममध्ये रहात होते, ही बाब सरकार पक्षाने प्रभावीपणे सिद्ध केली. तसेच, दिपालीचा खून कसा झाला याचे आश्रुबाने काहीही स्पष्टीकरण न दिल्याने दिपालीचा खून त्यानेच केला आहे, असा युक्तीवाद केला. हा युक्तिवाद आणि पुरावा ग्राहय धरून न्यायालयाने आश्रुबा नरसिंगे यास जन्मठेपेची शिक्षा आणि दहा हजार रूपये दंड ठोठावला.