Beed Crime : आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्याशी जवळीक असलेल्या सतीश भोसले (Satish Bhosale) उर्फ खोक्या भाईने शिरुर गावातील दिलीप ढाकणे यांच्यासह त्याचा मुलगा महेश ढाकणेला मारहाण केली होती. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसलेच्या अटकेची मागणी जोर धरत आहे. त्यातच खोक्या भाई विरोधात तक्रार केलेल्या ढाकणे पिता-पुत्रासह इतर दोघांवर शिरूर पोलीस ठाण्यात विनयभंग, ॲट्रॉसिटी जीवे मारण्याच्या उद्देशाने जबर मारहाण करणे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


खोक्याचे नातेवाईक शालन भोसले यांच्या फिर्यादीवरून दिलीप ढाकणे, महेश ढाकणे, संदीप ढाकणे आणि राम ढाकणे या चौघा जणांविरोधात हा गुन्हा नोंदविण्यात आला. विनयभंग, जातीवाचक शिवीगाळ, जिवे मारण्याचा उद्देशाने जबर मारहाण करणे, या कलमाअंतर्गत सदरील गुन्हा नोंदविला गेला आहे.


ढाकणे पिता-पुत्राने मारहाण केल्याची तक्रार 


ढाकणे पिता-पुत्रासह इतर दोघांनी फिर्यादीच्या मुलांना डुकरे पकडण्याचा फास लावण्यासाठी शेतात बोलावले होते. यानंतर फिर्यादीचे मुले शेतात फास लावायला गेले. दुसऱ्या दिवशी फासामध्ये डुक्कर पकडले गेले आहेत का? हे पाहण्यासाठी फिर्यादीचे मुले गेले होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या मुलीला आणि मुलाला जातिवाचक शिवीगाळ केली. मुलीचे तोंड दाबून तिला शेतात पाडले आणि तिच्यासोबत विनयभंग करून तिच्या पोटात लाथाबुक्याने जबर मारहाण केली. तर मुलाच्या डोक्यात तलवारीने वार करून जिवे मारण्याचा उद्देशाने त्याला जबर मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


खोक्याने केली होती ढाकणे पितापुत्राला मारहाण 


सतीश भोसले उर्फ खोक्या भाईला हरीण आणि मोरांच्या शिकारीचा शौक होता. खोक्याने आतापर्यंत साधारण 200 पेक्षा जास्त हरिणांना मारल्याचं आजूबाजूच्या गावातील लोकांचं म्हणणं आहे. याशिवाय डोंगरात वागूर (पक्षी पकडण्याचे जाळे) लावून कित्येक मोरही खाल्ले आहेत. काही दिवसांपूर्वी सतीश भोसले आणि त्याचे सहकारी दिलीप ढाकणे यांच्या शेतात हरणं पकडत होते. त्यावेळी दिलीप ढाकणे यांनी त्यांना हरणं पकडण्यास मज्जाव केला. तेव्हा खोक्या भाई आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दिलीप ढाकणे आणि त्यांच्या मुलाला अमानुष मारहाण केली होती. यामध्ये दिलीप ढाकणे (Dilip Dhakne) यांचे 8 दात पडले आहेत आणि त्यांचा जबडा फ्रॅक्चर झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्या भाईला अटक करण्याची मागणी केली जात आहे.  



आणखी वाचा 


Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण