बीड : भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आणि एका व्यक्तीला अमानुषपणे मारहाण केल्याच्या प्रकरणातील आरोपी सतीश ऊर्फ खोक्या भोसले याचे पैशांचे बंडल फेकण्यासह इतर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्याने आणखी एका व्यक्तीला देखील पैशाच्या आणि कामाच्या कारणास्तव अमानुषपणे मारहाण केल्याच्या व्हिडिओ समोर आला होता. दरम्यान या खोक्या उर्फ सतीश भोसले त्याचा सातबारा कोरा असतानाही गळ्यात सोने आणि हातात पैशांचे बंडल आले कोठून?, त्याचा नेमका धंदा काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. खोक्याने 200 हरिण मारल्याचा आणि सावकारकीचा आरोप आहे. दरम्यान खोक्यावर कोणाचा आशिर्वाद आहे, कोणाच्या जीवावरती तो इतका माज करतोय अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
वाल्मीक कराडचा निकटवर्तीय असल्याने मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधकांनी टीका केली आहे. परंतु, चार दिवसांपूर्वी आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या खोक्या भोसले याने एका व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. पैसे फेकणे, मुलांना धमकी देणे, असे व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. वन विभागाने शनिवारी त्याच्या घराची झडती घेतली त्यावेळी त्याच्या घरात शिकारीसह अन्य काही सामान जप्त करण्यात आलं आहे, वाळलेले मांस आणि शिकारीचे साहित्य आढळले होते. त्याच्यावर शिरूर पोलिसात दोन गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.
खोक्या उर्फ सतीश भोसले यांच्यावरती फसवणूक, गुंडगिरी, सावकारी व पक्षविरोधी काम खोक्या करत होता. त्यामुळेच 2021 साली भाजप भटके-विमुक्त आघाडी, बीड जिल्हाध्यक्ष या जबाबदारीने त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती, त्याचवेळी त्याचं निलंबन देखील झालं होतं, अशी माहिती डॉ. लक्ष्मण जाधव यांनी शनिवारी दिली आहे. तरीही तो आपलाच कार्यकर्ता आहे, असे आमदार धस यांनी माध्यमांना सांगितले होते.
मी 2021 साली त्याची पदावरून हकालपट्टी केली
भाजप भटके विमुक्त आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष डॉ. लक्ष्मण जाधव यांनी म्हटले आहे की, दोन-तीन दिवसापासून सतीश भोसले उर्फ खोक्या याच्याबाबत माध्यमांमध्ये बातम्या सुरू आहेत. सतीश भोसलेने भटके विमुक्त आघाडीचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांना जातीची खोटी माहिती सांगून भटक्या विमुक्त युवा आघाडी राज्य उपाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र घेतले होते. सतीश भोसले हा आदिवासी समाजाचा कार्यकर्ता आहे. तो अनुसूचित जमातीमध्ये मोडतो. भटके विमुक्त प्रवर्ग हा वेगळा आहे. तरीदेखील त्याने चुकीची माहिती सांगून पद मिळवले होते. मला हे कळल्यानंतर मी 2021 साली त्याची पदावरून हकालपट्टी केली होती. त्यानंतर तो पक्ष विरोधी कारवाई, खंडणी, अपहरण असे प्रकार करत असल्यामुळे भारतीय जनता पार्टीने त्याच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देखील घेतला होता. सध्या तो कुठल्याही पदावर नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
नेमका कोण आहे सतीश भोसले?
सतीश भोसले हा मागील पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय असून तो शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. त्याच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद होते. सामाजिक कार्यातून ओळख निर्माण केली आहे. तसेच पारधी समाजासाठी सामाजिक कार्य केले.अलीकडच्या काळात सुरेश धस यांच्याशी संपर्क आल्याने जवळीक वाढली. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात दबदबा निर्माण झाला आहे. सतीश भोसलेने शिरुर गावातील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. यानंतर त्याचे अनेक कारनामे समोर आले आहेत. सतीश भोसलेने केलेल्या मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान खोक्या भाईला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे.