बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणात एक आरोपी अजूनही मोकाट आहे. गेले दोन महिने देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी हे प्रकरण लावून धरलंय. याच दरम्यान अंजली दमानियांच्या रडारवर आणखी एक नाव आलंय ते म्हणजे बालाजी तांदळे. देशमुखांच्या हत्येनंतर याच तांदळेची गाडी घेऊन पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला होता. इतकंच नव्हे तर त्यावेळी तांदळे हा पोलिसांसोबत होता. मात्र बालाजी तांदळे हा धनंजय मुंडे आणि आरोपी वाल्मिक कराडचा निकटवर्तीय मानला जातो. त्यामुळे दमानियांनी आता पोलिसांनाच आरोपींच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.
धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांच्या रडारवर आणखी एक नाव आलं आहे आणि ते म्हणजे बालाजी तांदळे. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासावर अंजली दमानियांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
आपण हे प्रकरण लावून धरलं नसतं तर वाल्मिक कराडही पकडला गेला नसता असं दमानियांनी एक ट्विट करत म्हटलं आहे. मात्र याच ट्विटमध्ये दमानियांनी अजून एकाचा उल्लेख केला तो म्हणजे बालाजी तांदळेचा. याच बालाजी तांदळेच्या गाडीचा वापर करुन पोलिस आरोपींचा शोध घेत होते.
आरोपीच्या निकटवर्तीयाला घेऊन पोलिसांचा शोध
आरोपींच्या शोधासाठी माझीच गाडी पोलिस वापरत होते आणि मी सुद्धा आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांच्या सोबत होतो. माझी गाडी पोलिस वापरत होते याचे अधिकृत पत्र आहे ते रेकॉर्डवर आहे असं बालाजी तांदळेने म्हटलं आहे.
आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांच्या अटकेवेळी बालाजी तांदळे पोलिसांसोबत होता. मात्र तांदळे हा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा निकटवर्तीय असल्याचं दमानियांचं म्हणणं आहे. त्यामुळे आरोपींच्या निकटवर्तीयाला सोबत घेऊन त्याचीच गाडी वापरुन पोलिस कसा काय शोध घेऊ शकतात असा सवाल दमानियांनी उपस्थित केला.
बालाजी तांदळेवर याआधीही आरोप
बालाजी तांदळे हे नाव याआधीही अनेकदा वादात सापडलं होतं. बालाजी तांदळेने एका दुकानातून ब्लँकेट खरेदी करुन पोलिस कोठडीत असलेल्या आरोपींना पुरवल्याचा आरोप संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी केला होता. याशिवाय आरोपींना पाण्याचे बॉटल्स देणं, बीड पोलिस स्टेशनमध्ये सीआयडी ऑफिसर असल्याचं सांगत एन्ट्री करणं आणि वाल्मिक कराडची भेट घेणं हेदेखील आरोप याच बालाजी तांदळेवर आहे.
अंजली दमानियांनी या सगळ्या प्रकरणात आता पोलिसांचे सीडीआर तपासण्याची मागणी केली आहे. याच बालाजी तांदळेची कसून चौकशी केल्यास बरंच काही बाहेर येईल असं दमानियांचं म्हणणं आहे. दमानियांप्रमाणेच सुरेश धस यांनी देखील पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वपक्षीय नेत्यांनी केलेल्या आरोपांमुळे बीड पोलिसांची भूमिका नेहमीच संशयाच्या भोवऱ्यात राहिली आहे. आता तर पोलिसांनाच आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आल्यानं तपासावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
ही बातमी वाचा: