बीड : सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आकाचे आका म्हणत मंत्री धनंजय मुंडेंविरोधात आरोपींची राळ उडवणारे सुरेश धस हे मुंडेंशी गुप्त भेटीनंतर विरोधकांसह स्थानिकांच्या निशाण्यावर आले होते. त्यानंतर पहिल्यांदाच धसांनी मस्साजोगमध्ये येत संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आणि ग्रामस्थांशीही चर्चा केली. यावेळी पुन्हा एकदा मस्साजोगवासियांनी धसांवर विश्वास ठेवत त्यांना आपला पाठिंबा दर्शवला. एवढंच नाही तर धसांनी पोलिस स्टेशनला भेट देऊन अधिकाऱ्यांकडून तपासाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी निलंबित केलेले पीएसआय राजेश पाटील आणि पीआय महाजन यांना सहआरोपी करण्याची मागणी केली.
मुंडेशी झालेल्या भेटीनंतर सुरेश धस यांच्या विश्वासार्हतेला तडा गेल्याचं बोललं गेलं. पण थेट मस्साजोगला भेट देऊन धस यांनी या सगळ्या शक्यता खोट्या ठरवल्या. मस्साजोगच्या निमित्तानं मराठा समाजाचं नेतृत्व कुणाकडे? धस यांच्याकडे की जरांगेंकडे? या प्रश्नाचं उत्तरही मस्साजोगवासीयांनी दिलं.
हात वर करून मस्साजोगच्या ग्रामस्थांचा पाठिंबा
एकीकडे सुरेश धस यांनी मराठा समाजाचा विश्वासघात केल्याचा आरोप जरांगे यांनी केला. तर दुसरीकडे मसाजोग ग्रामस्थांनी माझ्यावर हात वर करून विश्वास दाखवला आहे असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
ज्यांच्यावर आरोप केले त्या धनंजय मुंडे यांची गुप्त भेट घेतल्यानं सुरेश धस बॅकफूटवर गेले होते. संकटात सापडलेली विश्वासार्हता पुन्हा कमावण्यासाठी अखेर धस तडक मस्साजोगला पोहोचले. संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि मस्साजोगच्या गावकऱ्यांशी संवाद साधला. मस्साजोगच्या गावकऱ्यांनी हात वर करून सुरेश धस यांच्यावर विश्वास व्यक्त केला.
जरांगेंचा अविश्वास
सुरेश धस मस्साजोगमध्ये जाण्याच्या एक दिवस आधीच मनोज जरांगेंनी मस्साजोगच्या गावकऱ्यांची भेट घेतली होती. मराठा समाजाच्या नेतृत्वासाठी धस आणि जरांगे यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जातंय. धनंजय मुंडेंना भेटणाऱ्या धस यांच्यावर जरागेंचा काडीमात्र विश्वास राहिलेला नाही. राजीनामा देतो पण मुंडेंना भेटणार नाही, अशी भूमिका धसांनी घ्यायला हवी होती असं जरांगेंनी म्हटलं.
बावनकुळेंवर ग्रामस्थांची टीका
ज्या बावनकुळेंच्या पुढाकारानं मुंडे-धस भेट झाली होती त्या बावनकुळेंनी धस यांच्या मस्साजोगच्या भेटीचं स्वागत केलं. पण मस्साजोगच्या गावकऱ्यांचा सुरेश धस यांच्यावर विश्वास असला तरी बावनकुळे यांच्यावर मात्र राग आहे. बावनकुळेंचं नावदेखील घेण्याची इच्छा नाही असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं. तर बावनकुळेंनी ही भेट कशासाठी घडवून आणली? असा प्रश्न गावकऱ्यांनी विचारला आहे.
मस्साजोगमध्ये धस यांचं स्वागत झालं असलं तरी परळीत मात्र त्यांना विरोधाला सामोरं जावं लागलं. परळीत धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी धस यांना काळे झेंडं दाखवत घोषणाबाजी केली. धस जातीयवाद करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
एका भेटीमुळे संकटात सापडलेल्या धस यांनी मस्साजोगला भेट देत आपली खुंटी पु्न्हा बळकट करून घेतली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण धस हेच धसास लावतील, असा विश्वास गावकऱ्यांना आहे. जरांगे धस यांच्यावर टीका करत असले तरी गावकऱ्यांनी त्याची फिकीर केलेली नाही. त्यामुळे मस्साजोगच्या लढाईत जरांगे यांच्यापेक्षा धस यांचं पारडं सध्या तरी जड दिसतंय. पण या राजकारणापेक्षा खरा मुद्दा आहे तो संतोष देशमुख यांना न्याय मिळण्याचा.
ही बातमी वाचा: