बीड: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी अंतरवाली सराटी येथे सुरु केलेल्या आंदोलनावरुन लक्ष दुसरीकडे वळण्यासाठीच राज्य सरकारने बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर केला, असा आरोप ऑल इंडिया पँथर संघटनेचे प्रमुख दीपक केदार यांनी केला आहे. अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) याचा सोमवारी संध्याकाळी पोलिसांकडून मुंब्रा परिसरात एन्काऊंटर करण्यात आला होता. तेव्हापासून या घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर दीपक केदार यांनी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरच्या टाईमिंगबाबत शंका उपस्थित केली आहे.
राज्य सरकारला मनोज जरांगे यांचे आंदोलन आणि उपोषण हे रोखता येत नाही. त्यामुळेच मिडिया आणि ग्राऊंडवरुन मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे एन्काऊंटर करण्यासाठीच अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर करण्यात आले. हे राजकीय एन्काऊंटर आहे. येत्या 20 ते 25 दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे हे दिवस सरकारला काढणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच मराठा आरक्षण आंदोलनावरुन (Maratha Reservation) लक्ष हटवण्यासाठी अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर करण्यात आले. त्यामुळे मराठा समाजाने मनोज जरांगे यांची काळजी घ्यावी, असे आवाहन दीपक केदार यांनी मराठा समाजाला केले.
अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरनंतर राज्यात आता जल्लोष केला जाईल, पेढे वाटले जातील. या सगळ्यात मनोज जरांगे यांचे आंदोलन उद्ध्वस्त होऊ नये, याची कळजी घेणे गरजेचे आहे. राज्य सरकारने कितीही प्रयत्न केले तरी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन दडपू शकत नाही, असे दीपक केदार यांनी म्हटले.
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आठवा दिवस
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे. मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याने त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. त्यांना सतत चक्कर येत आहे. तसेच मनोज जरांगे यांना जागेवर बसणे किंवा उभे राहणेही मुश्कील झाले आहे.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनापासून काही अंतरावर वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके हेदेखील ठिय्या देऊन बसले आहेत. यामुळे सध्या जालन्यात मराठा आणि ओबीसी आंदोलनकांमध्ये तणावाचे वातावरण आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत असल्याने मराठा आंदोलकांमधील खदखद वाढण्याची शक्यता आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी काल अंतरवाली सराटीत येऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांना काही झाल्यास सरकार जबाबदार असेल, असा इशारा दिला होता.
आणखी वाचा
मी ओरिजनल मराठ्यांच्या औलादीचा, भिडा म्हटल तर चटणीला पुरणार नाहीत; मनोज जरांगे भडकले