ठाणे: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे हा सोमवारी संध्याकाळी मुंब्रा बायपासवर झालेल्या पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाला होता. अक्षय शिंदे याने पोलिसांकडील रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केला. यामध्ये एक पोलीस अधिकारी जखमी झाला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) याच्या डोक्यात गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. बदलापूर प्रकरणातील (Badlapur Sexual Assault Case) इतर सहा आरोपींना वाचवण्यासाठी माझ्या मुलाचा बळी देण्यात आला, असा आरोप अक्षय शिंदे याच्या वडिलांनी केला.


अक्षय शिंदे याचे आई-वडील सोमवारी रात्रभर अक्षयचा मृतदेह असलेल्या कळवा शासकीय रुग्णालयाबाहेर ठाण मांडून बसले होते. या दोघांनाही अक्षयचा मृतदेह दाखवण्यात आलेला नाही. शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतरच मृतदेह तुम्हाला दाखवू, असे अक्षयच्या आई-वडिलांना सांगण्यात आले आहे. अक्षयचा मृतदेह आता जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेला जाईल. त्यानंतर हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाईल, असे सांगितले आहे. मात्र, अक्षय शिंदे याच्या पालकांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत अक्षयचा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.


पोलिसांनीच अक्षयला मारण्यापूर्वी तो पेपर त्याच्या खिशात ठेवला; अक्षय शिंदेच्या आईचा आरोप


अक्षय शिंदे याच्या आईने पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. अक्षयच्या आईने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, पोलीस आम्हाला काहीच बोलले नाहीत. आम्ही अक्षयला भेटायला तुरुंगात गेले होते तेव्हा त्याने मला विचारले, 'मम्मी मला कवा घेऊन जाणार तुम्ही?' मी त्याला म्हणाले की, मी वकिलांशी बोलून घेते, आपण एका महिन्यानंतर तुला सोडवू. त्यानंतर मी अक्षयला विचारले की, तुला खायला-प्यायला देतात का? त्यावर अक्षयने, हो मला खायला देतात, असे सांगितल्याचे आईने म्हटले.


अक्षयने मला जेलमध्ये एक मोठा पेपर दाखवला. यामध्ये काय आहे वाचून बघ असे तो म्हणाला. पण मला वाचता येत नाही. तो पेपर अक्षयच्या खिशात ठेवला होता. त्यामध्ये काय लिहलं होतं, माहिती नाही. मात्र, पोलिसांनीच तो पेपर मुद्दाम अक्षयच्या खिशात ठेवला असेल. त्या लोकांनीच मुद्दाम,हा पोरगा असं करुन घेणार, असे कागदावर काहीतरी लिहून, तो अक्षयच्या खिशात ठेवला असावा. त्या लोकांना अक्षयला मारायचं होतं, म्हणूनच त्याच्या खिशात ती पावती ठेवली असेल. पोलीस आता खोटं बोलत आहेत. त्यांना कोणीतरी पैसे दिले आहेत, असा आरोप अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी केला.


बाकीच्या सहा आरोपांनी वाचवण्यासाठी पोलिसांनी माझ्या मुलाला ठार मारलं, अक्षय शिंदेच्या वडिलांचा आरोप


या प्रकरणात आणखी सहाजण आरोपी आहेत. पोलिसांनी त्यांना शोधलं नाही आणि आमच्या पोराला मारुन टाकलं. त्यांना वाचवण्यासाठीच आमच्या पोराला मारण्यात आले. आम्ही सध्या स्टेशनवर कचऱ्यात राहतो, तिथेच झोपतो. पोलिसांनी अक्षयला पकडून नेलं, तेव्हापासून आम्ही फरार आहोत, मीडियासमोर आलो नाही. याप्रकरणात जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे. तेव्हाच आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ. अन्यथा आम्हालाही गोळ्या घालून ठार मारा, आम्ही मरायला तयार आहोत, असे अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी म्हटले.


VIDEO: अक्षय शिंदेच्या आईवडिलांचा खळबळजनक दावा



आणखी वाचा


पोलीस चालत जाऊन रुग्णालयातील स्ट्रेचरवर झोपले, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर जितेंद्र आव्हाडांचा दावा