Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) दोन दिवसीय बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज अजित पवारांनी सकाळी पावणे सहा वाजताच आपल्या दौऱ्याला सुरुवात केलीय. बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरू असलेल्या महसूल भवनाची पाहणी करत त्यांनी आढावा घेतला. यावेळी अजित पवारांनी कंत्राटदाराला तंबी दिल्याचे दिसून आले.

अजित पवार यांनी कंत्राटदाराला खडसावत इथे चुकीचा प्रकार चालणार नाही. इथला कॉन्ट्रॅक्टर कोण? कोणाला काहीही द्यायचे काम नाही. राज्याला आम्ही अकराशे ते बाराशे कोटींचा निधी दिलाय. तुम्ही जर चांगलं काम केलं नाही. तर ब्लॅक लिस्टमध्ये टाकेल.  तुम्ही माझ्या हाताखाली काम करतात. इथे चुकीचे प्रकार चालणार नाहीत, अशी तंबीच कंत्राटदाराला अजित पवारांनी दिल्याचे पाहायला मिळाले. 

अजितदादांच्या दौऱ्यादरम्यान अधिकाऱ्यांची तारांबळ

अजित पवार हे कालपासून बीड दौऱ्यावर आहेत. मात्र या दौऱ्यात आज सकाळपासूनच अजित पवार हे त्यांच्या ठरलेल्या वेळेआधीच कामाला लागल्याने प्रशासनाची धावपळ झाली. अजित पवार हे आज सकाळी 6.30 वाजता कनकालेश्वर मंदिर विकास आराखड्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी पोहोचणार होते. मात्र, ते त्या ठिकाणी 6:15 मिनिटालाच दाखल झाले. त्यानंतर त्यांनी महसूल विभागाची इमारत आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. या ठिकाणी देखील अजित पवार हे नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास आधी पोहोचल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारी कार्यालयात 10 वा. परळी मतदार संघातील विकास कामाबाबतची बैठक होणार होती. मात्र, अजित पवारांनी ही बैठक 8.25 लाच सुरु केली. तसेच, आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास  आराखडा, जिल्ह्यातील मुख्य इमारतीचे प्लॅन सादरीकरण, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय आराखडा यासंदर्भात बैठका होणार आहेत. 

अजित पवारांचा पंकजा मुंडेंना मोठा धक्का

दरम्यान, मंत्री पंकजा मुंडे यांची साथ सोडत माजलगाव मतदारसंघातील मुंडे पिता-पुत्रांचा आज राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षप्रवेश होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी साडेपाच वाजता वडवणी शहरात या पक्षप्रवेशाचे आयोजन करण्यात आले आहे. मागील 35 वर्षांपासून दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेले राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे या दोघा पिता पुत्रांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश होणार आहे. माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश होतोय. यादरम्यान धनंजय मुंडे यांना डावलण्यात आल्याचे देखील पाहायला मिळालं. या पक्षप्रवेशासाठी धनंजय मुंडेंना निमंत्रण नसल्याने ते उपस्थित राहणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. तर वडवणी येथे पक्षप्रवेशाच्या बॅनरवर धनंजय मुंडे यांचे फोटो देखील वगळण्यात आले आहे. वडवणी नगरपंचायतीसह धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर मुंडे पिता पुत्राचे वर्चस्व आहे. दरम्यान या पक्षप्रवेशामुळे माजलगाव मतदार संघातील राजकीय समीकरण बदलणार हे निश्चित मानलं जात आहे.

आणखी वाचा 

अजित पवारांचा 2 दिवसीय बीड दौरा; मॅरेथॉन बैठका, सोळंके - मुंडेंची गटबाजी, अजित दादांच्या लिस्टवर नेमकं काय ?