Beed News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कालपासून (6 ऑगस्ट) बीडच्या दौऱ्यावर आहेत. अशातच अजित पवार यांच्या गेल्यावेळीच्या लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान मोठा वाद निर्माण झाला होता. परिणामी आजच्या उपमुख्यमंत्र्याच्या दौऱ्यानिमित्य शेतकरी नेते आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते नजरकैदेत ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईवरून छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत टीका केली आहे.
विजयकुमार घाडगे म्हणाले की, शेतकरी आंदोलनातील नेते आणि छावा कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना नजरकैदेत ठेवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न का केला जातोय? असा थेट सवाल घाडगे पाटलांनी उपस्थित केलाय. शेतकऱ्यांचे प्रश्न, विशेषतः कर्जमाफी, पीकविमा आणि उत्पन्नाच्या हमीभावा संबंधी मागण्या सातत्याने प्रलंबित असताना, नेत्यांना भेटण्याचा आणि आपली व्यथा मांडण्याचा अधिकार का नाकारला जातो? असा मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय.
......तर ते तुमचं स्वागत करतील!
शेतकऱ्यांच्या मुलांना नजरकैदेत ठेवून नव्हे, त्यांचा हक्काचा आवाज ऐकून कर्जमाफी द्या, ते तुमचं स्वागत करतील! असे संतप्त शब्द वापरत त्यांनी सरकारवर टीका केली. छावा संघटनेने आधीपासूनच शेतकरी हक्क, तरुणांच्या रोजगाराच्या संधी आणि ग्रामविकासाच्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. अशा पार्श्वभूमीवर बीडमधील ही कारवाई निषेधार्ह असल्याचं मत अनेक कार्यकर्त्यांनी मांडलं आहे.
दुसरीकडे, अजित पवारांच्या दौऱ्यात पहिल्या दिवशी गैरहजर असणारे धनंजय मुंडे आज मात्र सकाळी 8.30 वाजताच जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत. आज परळी मतदारसंघाच्या कामकाजासंदर्भात बैठक होत असल्याने धनंजय मुंडे या बैठकीला उपस्थित आहेत. गेवराई मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित देखील या बैठकीसाठी उपस्थित आहेत.
नियोजित दौऱ्याच्या वेळेआधीच अजित पवारांचे काम सुरू, प्रशासनाची धावपळ
अजित पवार हे कालपासून बीड दौऱ्यावर आहेत. मात्र या दौऱ्यात आज सकाळपासूनच अजित पवार हे त्यांच्या ठरलेल्या वेळेआधीच कामाला लागल्याने प्रशासनाची धावपळ झालेली पाहायला मिळालेली आहे. अजित पवार हे आज सकाळी 6.30 वाजता कनकालेश्वर मंदिर विकास आराखड्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी पोचणार होते मात्र ते त्या ठिकाणी 6:15 मिनिटालाच दाखल झाले.
त्यानंतर त्यांनी महसूल विभागाची इमारत आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. या ठिकाणी देखील अजित पवार हे नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास आधी पोहोचल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारी कार्यालयात 10 वा. परळी मतदार संघातील विकास कामाबाबतची बैठक होणार होती. मात्र ही बैठक पवारांनी 8.25 ला पोचत ही बैठक सुरू केली.
अजित पवार यांच्या नियोजित दौऱ्या मधील वेळे आधीच साधारण अर्धा ते एक तास आधीच पोचल्याने बीड मधल्या प्रशासनाची यावेळी धावपळ झाल्याचे दिसून आलेय. आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखडा, जिल्ह्यातील मुख्य इमारतीचे प्लॅन सादरीकरण, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय आराखडा यासंदर्भात बैठका होणार आहेत.
हेही वाचा: