बीड : जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संसदेत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधीमंडळात या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने व्हावा आणि आरोपींना तात्काळ अटक व्हावी, अशी मागणी केली जात आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे या प्रकारांची चर्चा राज्यभरात होत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार देखील मस्साजोग गावात दाखल झाले. यावेळी अजित पवारांना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. 


देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर अजित पवार म्हणाले की, संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या झाली. त्याचे दुःख सगळ्यांना आहे. इथे कुणाचाही राजकीय हस्तक्षेप होणार नाही. दोषींना फाशीची शिक्षा होणार आहे. याचा कुणीही मास्टरमाईंड असेल त्याला सोडणार नाही. याबाबत बऱ्याच चर्चा होत आहेत. कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल, अशी चर्चा आहे. पण मुख्यमंत्र्यांनी चौकशीचा निर्णय घेतला आहे. यात कोणतीही त्रुटी राहणार नाही. मी सरकारच्या वतीने संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या प्रकरणाचा संपूर्ण तपास पूर्ण होईपर्यंत कुणालाही सोडले जाणार नाही, असे त्यांनी म्हटले. 


अजित पवारांना धनंजय मुंडे, वाल्मिक कराडबाबत प्रश्न, दादा म्हणाले...


यानंतर अजित पवार मस्साजोगमधून परतत असताना गावकऱ्यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या संदर्भात त्यांना प्रश्न उपस्थित केला. तसेच  अजित पवार यांना गावकऱ्यांनी थांबण्याचं आवाहन केले. यावेळी अजित पवार यांनी मी हेलिकॉप्टरने आलोय. अंधार पण पडत आहे. मला आधी लातूरला पोहोचायचं आहे, असं कारण सांगून ते तिथून निघून गेले.



बीडमध्ये काय म्हणाले शरद पवार? 


शरद पवार यांनी मस्साजोग गावातील जनतेला धीर देत संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा खोलात जाऊन तपास करण्याची गरज व्यक्त केली. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने आर्थिक मदत केली आहे. पण या मदतीने दु:ख कमी होत नाही. त्यामुळे या हत्याप्रकरणाच्या खोलात जाऊन सूत्रधारांना तातडीने धडा शिकवला पाहिजे, असे शरद पवार यांनी सांगितले. मी इकडे आलो याचं कारण महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात घडलेली गोष्ट ही राज्याला न शोभणारी आहे. देशमुख कुटुंबीयांना न्याय दिला पाहिजे. ते दु:खी आहेत. आपण त्यांच्यासोबत आहोत. पण येथील स्थिती कशी दुरुस्त होईल, याची काळजी आपण घेतली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


Sharad Pawar: शरद पवारांनी मस्साजोगमध्ये पाऊल ठेवताच धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या, गावकरी म्हणाले....