मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Massajog Sarpanch Santosh Deshmukh) यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्यावर विरोधकांनी गंभीर आरोप केले आहेत. तर परभणी हिंसाचार (Parbhani Violence) प्रकरणात पोलिसांच्या कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Surywanshi) यांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज बीड आणि परभणीचा दौरा केला. या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे देखील परभणी आणि बीडचा दौरा करणार आहेत. 


उपमुख्यमंत्री अजित पवार आज मस्साजोगला जाणार आहे. दुपारी ३ वाजता विमानाने अजित पवार नागपूरहून लातूरला रवाना होणार आहेत. लातूरवरुन हेलिकॉप्टरने मस्साजोगला जाऊन देशमुख कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यावर परभणीत दाखल होतील. परभणीत अजित पवार सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार आहेत. शरद पवारांच्या पाठोपाठ अजित पवार बीड आणि परभणी दौरा करणार असल्याने हा दौरा महत्त्वाचा मानला जात असून यावेळी अजित पवार नेमकं काय बोलणार? हे पाहणे महात्त्वाचे ठरणार आहे.  


बीडमध्ये काय म्हणाले शरद पवार? 


शरद पवार यांनी मस्साजोग गावातील जनतेला धीर देत संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा खोलात जाऊन तपास करण्याची गरज व्यक्त केली. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने आर्थिक मदत केली आहे. पण या मदतीने दु:ख कमी होत नाही. त्यामुळे या हत्याप्रकरणाच्या खोलात जाऊन सूत्रधारांना तातडीने धडा शिकवला पाहिजे, असे शरद पवार यांनी सांगितले. मी इकडे आलो याचं कारण महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात घडलेली गोष्ट ही राज्याला न शोभणारी आहे. देशमुख कुटुंबीयांना न्याय दिला पाहिजे. ते दु:खी आहेत. आपण त्यांच्यासोबत आहोत. पण येथील स्थिती कशी दुरुस्त होईल, याची काळजी आपण घेतली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. 


संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी बारामतीत शोकसभा


दरम्यान, बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बारामतीमध्ये त्यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. बारामतीतील जिजाऊ भवन या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ही शोकसभा होणार असून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच राजकीय वरदहस्त आरोपींना कोणाचा आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे. त्यांनादेखील शासन होणे गरजेचे आहे, अशी मागणी क्रांती मोर्चाच्या वतीने मागणी करण्यात आली. तसेच मराठा विखुरलेल्या परिस्थितीत आहे. मराठा समाजाने एकत्र येऊन लढा देण्याची वेळ आली असल्याचे भूमिका मांडण्यात आली आहे. 


आणखी वाचा 


Santosh Deshmukh Case: बीडची कायदा सुव्यवस्था सरळ करणार, कडक शिस्तीचा IPS आता पदभार घेणार, कोण आहेत नवनीत कांवत?