Dhananjay Munde: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी पक्षातील नेत्यांना काही सूचना केल्या होत्या. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांना, आमदारांना आपापल्या मतदारसंघातील नागरिकांच्या, नियमितपणे समस्या ऐकून त्यावर तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यासाठी त्यांनी जनता दरबार घेण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. या मंत्र्यांना दर मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी जनता दरबार आयोजित करून सर्वसामान्यांशी थेट संवाद साधण्यास सांगण्यात आले होते. मात्र, मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.
धनंजय मुंडेंनी पक्षाच्या अध्यक्षांच्या आदेशांना दाखवली केराची टोपली
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांना जनता दरबार घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. 7 जानेवारी पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांच्या पक्ष कार्यालयातील जनता दरबारला सुरवात झाली होती. आत्तापर्यंत जनता दरबाराचे 6 आठवडे उलटून गेले पण धनंजय मुंडे हे अद्याप एकही जनता दरबाराला उपस्थित राहिले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इतर सगळे मंत्री न चुकता जनता दरबाराला उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं काम करतात. मात्र, धनंजय मुंडे यांनी आपल्याच पक्षाच्या अध्यक्षांच्या आदेशांना केराची टोपली दाखवली आहे, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
अजित पवारांनी पक्षाच्या मंत्र्यांना जनता दरबार घेण्याच्या सूचना
हा जनता दरबार राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात आयोजित केला जाणार होता. कोणता दिवशी कोणता दरबार हे देखील ठरवण्यात आलेले आहे. आता दर मंगळवारी कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे दत्तात्रय भरणे आणि मकरंद पाटील यांचा जनता दरबार भरणार होता. बुधवारी माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, बाबासाहेब पाटील, आदिती तटकरे जनता दरबाराचे आयोजन केले जाणार आहेत. अजित पवार यांनी यापूर्वी बारामतीत जनता दरबार भरवला आहे. या जनता दरबाराच्या माध्यमातून पक्षाचे नेते जनतेचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतील आणि त्याचवेळी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम पक्षाचे हे सर्व मंत्री करतील. अजित पवार नेहमीच आपल्या बारामती मतदारसंघात जनता दरबार घेतात, त्याप्रमाणे पक्षातील इतर नेत्यांना आणि मंत्र्याना सूचना देण्यात आल्या होत्या.मात्र, अजित पवारांच्या या आदेशाला धनंजय मुंडे यांनी केराची टोपली दाखवली आहे.