मुंबई : मागील काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात जे 'ट्विस्ट अँड टर्न' झाले त्यावर लवकरच एक चित्रपट काढला पाहिजे कारण या सिनेमाची स्क्रिप्ट तयार आहे, अशी भावना महाराष्ट्र सरकारमधील नवनिर्वाचित मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. एबीपी माझाच्या 'कॉफी विथ मिनिस्टर'  मध्ये बोलताना थोरात यांनी विविध विषयावर आपले मत व्यक्त केले. काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. शिवतीर्थावरील या सोहळ्यात सहा अन्य मंत्र्यांनी देखील शपथ घेतली. यात कॉंग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांनी देखील शपथ घेतली.


एबीपी माझाशी बोलताना थोरात म्हणाले की, देवेंद्र फडणवीस म्हणायचे की त्यांना समोर मला विरोधी पक्ष दिसत नाही, मी म्हणायचो आरशासमोर उभे रहा मग तुम्हाला विरोधी पक्ष दिसेल. माझा विश्वास होता बदल निश्चित होईल आणि तो झाला. शिवसेनेसोबत जाण्याबाबत विचारले असता थोरात म्हणाले की, शिवसेनेसोबत जाणं अवघड होतं. पण इतिहास पाहिला तर बाळासाहेब यांनी इंदिरा गांधी यांना पाठिंबा दिला होता. तो इतिहास कामी आला, असे ते म्हणाले.

गेली 4 महिने खूप धावपळ होती. आता थोडा रिलॅक्स आहे. कारण पहिला टप्पा काल पूर्ण झाला आहे. आजपासून कामाला सुरुवात झाली आहे, असेही ते म्हणाले. माझं आता कुटुंब घरापूरतेच मर्यादित राहील नाही आता संपूर्ण राज्य कार्यकर्ते हे सगळे माझं कुटुंब झालंय, असे थोरात म्हणाले.

अजित पवार हे भाजप सोबत गेले पुन्हा आले या सगळ्या घडामोडी बद्दल मला फारसं काही बोलायचं नाही असे ते म्हणाले. पण मागील काही दिवसात जे ट्विस्ट अँड टर्न झाले त्यावर लवकरच एक चित्रपट काढला पाहिजे कारण स्क्रिप्ट तर तयार आहे, असे थोरात म्हणाले.

शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे. शेतकऱ्याच्या मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे याकडे आता आमचं सरकार लक्ष देईल, असंही ते म्हणाले. शपथविधीच्या आधी नेत्यांची नावं घेण्यानरुन राज्यपाल महोदय का नाराज आहेत माहीत नाही. पण ज्येष्ठ नेत्यांचं नाव शपथविधी दरम्यान घेणं मला नाही वाटत काही गैर आहे. लाखो लोकं एक ठिकाणी येत असतील तर थोडं फार व्यवस्थेत इकडं तिकडं होऊ शकतं, मात्र कालच्या शपथविधीमध्ये शिस्त आपल्याला पाहायला मिळाली, असेही थोरातांनी सांगितलं.